शाळा, क्लासेसकडून विद्यार्थ्यांना डिजिटल धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 04:23 AM2020-03-19T04:23:10+5:302020-03-19T04:23:24+5:30

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच त्यांची अभ्यासाची सवय मोडू नये, यासाठी शैक्षणिक संस्था डिजिटल मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करत आहेत.

Digital lessons for students from schools, classes | शाळा, क्लासेसकडून विद्यार्थ्यांना डिजिटल धडे

शाळा, क्लासेसकडून विद्यार्थ्यांना डिजिटल धडे

Next

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. या दोन आठवड्यांत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच त्यांची अभ्यासाची सवय मोडू नये, यासाठी शैक्षणिक संस्था डिजिटल मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करत आहेत. या अंतर्गत ई-र्लनिंग, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि ईमेल्स, शाळेच्या संकेतस्थळांचा प्रभावी वापर करून विद्यार्र्थ्यांना आॅनलाइन धडे देण्याचा प्रयत्न केला जात आहे. खासगी कोचिंग क्लासेसनेही विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही प्राथमिकता असल्याने, याच पर्यायांचा अवलंब करण्याचे ठरविले आहे.
राज्यातील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आल्यानंतर, अनेक खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना पुढील सूचनांसाठी संकेतस्थळांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच माध्यमातून शिक्षक व व्यवस्थापन त्यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे शाळांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सायन येथील शिव शिक्षण संस्थेचे डी. एस. हायस्कूल व्हॉट्सअ‍ॅपचा प्रभावी वापर करत आहे. इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या प्रत्येक तुकडीच्या वर्गशिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले असून, या ग्रुप्सवर विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपत्रिका पाठविण्यात येत आहेत. त्या सोडवून विद्यार्थ्यांनी १ एप्रिल रोजी शाळेत घेऊन यायच्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासाची उजळणी होईल, अशी माहिती डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली.
महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशननेही पुढील आठ दिवसांसाठी आपल्या अखत्यारीतील सर्व खासगी क्लासेसचे लेक्चर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी डिजिटायझेशनकडे वळण्याची संधी म्हणून पाहायला हवे, असे मत अध्यक्ष सचिन कर्णावत यांनी व्यक्त केले.

स्वत:मध्ये नावीन्यता आणा
विद्यार्थ्यांच्या शंका आणि समस्यांचे निराकरण मोबाइलवर व्हिडीओ रेकॉर्ड करून करता येईल. व्हॉट्सअ‍ॅप किंवा इंस्टाग्रामवर अभ्यासाचे धडे रेकॉर्ड करून ते डिजिटली विद्यार्थी समूहांपर्यंत पोहोचविता येतील. विद्यार्थी सुरक्षेसह ई-र्लनिंगचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आणि स्वत:मध्ये नावीन्यता आणण्यात याचा उपयोग करून घेण्याचे आवाहनही त्यांनी असोसिएशनच्या अखत्यारीतल खासगी क्लासचालकांना केले आहे.

Web Title: Digital lessons for students from schools, classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.