Join us  

डिजिटल दिवाळीने मुंबापुरी उजळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 1:10 AM

मुंबईकरांनी लावले डिजिटल दिवे

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक सेलिब्रेशन डिजिटल करा, असे मुंबई महापालिकेने केलेले आवाहन नागरिकांनी तंतोतंत पाळले आहे. कारण यंदाची दिवाळी मोठया प्रमाणावर समाज माध्यमांवर साजरी होत असून, या निमित्तान का होईना मुंबईकरांनी कोरोनाला आपल्यापासून दोन हात दूर ठेवले आहे. वसूबारस, धनत्रोयदशी, अभयंगस्नान आणि लक्ष्मी पुजन आणि सोमवारचा पाडवा; अशा सर्वच शुभेच्छा एकमेकांना भेटून देण्याऐवजी फोनवर, समाज माध्यमांवरून देण्यात मुंबईकर पुन्हा एकदा टेक्नोसॅव्ही ठरले असून, यंदाच्या डिजिटल दिवाळीने मुंबापुरीचे आकाश उजळून निघाले आहे.

बंगळुरुनंतर नेट वापरात किंवा टेक्नॉलॉजी वापरात दिल्ली आणि मुंबईकरांचा नंबर लागतो. मुंबईकर तरुण असतो, विद्यार्थी असतो, नोकरदार वर्ग असोत, गृहिणी असोत वा ज्येष्ठ नागरिक असोत; प्रत्येकाने कोरोनाला हरविण्यासाठी नियम पाळले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फटाके देखील कमी फोडले आहेत. परिणामी लक्ष्मी पुजनच्या दिवशी आवाजाची पातळी कमी नोंदविण्यात आली असून, यामुळे मुंबईकरांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. मुळात पहिल्या आंघोळीपासून मुंबईकरांनी दिवाळीच्या डिजिटल शुभेच्छा देण्यास सुरुवात केली होती.

फेसबुक, व्हॉटस अ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा तंत्रज्ञानाचा वापर करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. दिवाळी पहाटदेखील डिजिटल पध्दतीने साजरी करण्यात आली. बाजारपेठेतील खरेदीसाठी केलेली गर्दी वगळता मुंबईकरांना शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी जाणेदेखील टाळले. सर्वच शुभेच्छा डिजिटल पध्दतीने दिल्या जात असून, व्हिडिओ, इमोजीसह प्रत्येक माध्यमाचा यासाठी वापर केला जात आहे. परगावी असलेल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना देखील डिजिटल माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. डिजिटल शुभेच्छांसाठी व्हॉटस अ‍ॅपचा मोठया प्रमाणावर वापर केला जात असून, त्यानंतर फेसबुक वापरले जात आहे.

रविवारीदेखील शुभेच्छा देण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर केला जात असून, मुंबईकरांनी असाच संयम दाखविला तर कोरोनाचा अधिक वेगाने बिमोड करता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नागरिकांनी शारीरिक दुरीकरण कटाक्षाने पाळणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवर्जून मास्क परिधान करणे आणि वारंवार साबणाने सुयोग्यप्रकारे हात धुणे या बाबींचा अवलंब करावयाचा आहे. तसेच नियंत्रित स्वरुपात दिवाळी साजरी करताना शक्यतो एकमेकांच्या घरी जाणे टाळावयाचे आहे, असे आवाहन सातत्याने केले जात आहे.

आजचा दिवस महत्त्वाचाn दिवाळीच्या काळात फराळासाठी परिचितांच्या / नातेवाईकांच्या घरी जाणे टाळा.n दिवाळीच्या शुभेच्छा या दूरध्वनीद्वारे वा दृकश्राव्य प्रणालीद्वारे द्याव्या.n भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो दृकश्राव्य प्रणालीद्वारे ओवाळावे.n भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी.n अपवादात्मक प्रसंगी एखाद्या घरी जाणे आवश्यक असल्यास घरात प्रवेश करण्यापूर्वी हात, पाय व चेहरा इत्यादी व्यवस्थितपणे साबण लावून धुवून घ्यावा. त्यानंतर ओले हात – पाय पुसण्यासाठी ज्यांच्या घरी गेलो आहोत, त्यांचा रुमाल वापरण्याऐवजी स्वतःचा रुमाल वापरावा. तसेच  घरात प्रवेश करताना व प्रवेश केल्यानंतर मास्क परिधान करावा.भाऊबीजभाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेल्या भाऊबीज या सणानिमित्त महापौर किशोरी पेडणेकर या सोमवारी सकाळी ११ वाजता २१ भावांसोबत दृकश्राव्य प्रणालीद्वारे भाऊबीज साजरी करणार आहेत.

टॅग्स :दिवाळी