Join us  

आता पालिका दवाखान्यात मिळणार ‘डाएट’ सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:59 AM

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसागणिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार हे आजार सर्रास ...

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसागणिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार हे आजार सर्रास दिसून येतात. मात्र अशा आजारांवर उपचार करताना औषधोपचारांसह आहारही समतोल राखण्याची आवश्यकता असते. मात्र सामान्यत: खासगी रुग्णालय वा डॉक्टरांचा आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे आता लवकरच पालिकेच्या ७२ दवाखान्यांत आहारतज्ज्ञांचा सल्ला घेता येणार आहे.इंडियन डाएटिक असोसिएशनच्या माध्यमातून महानगरपालिकेसोबत संयुक्तपणे हा प्रस्ताव राबविण्यात येणार आहे. सुरुवातीला सहा महिन्यांसाठी शहर-उपनगरातील पालिकेच्या ७२ दवाखान्यांमध्ये असोसिएशनच्या माध्यमातून आहारतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल. रुग्णांना आहारतज्ज्ञांकडून मोफत उपचारांची सेवा मिळणार आहे. पालिकेने काही महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनासआले होते, त्या पार्श्वभूमीवर आहारतज्ज्ञ नेमणुकीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

याविषयी आहारतज्ज्ञ केतकी शहा यांनी सांगितले की, रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती सुधारण्यासाठी औषधोपचाराबरोबर पोषक आहाराचीही नितांत गरज असते. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणाºया आहारतज्ज्ञांची पालिका दवाखान्यांत वानवा आहे. आहारतज्ज्ञांच्या असंतुलित संख्येमुळे रुग्णांना उपचारादरम्यान ताटात पडेल तो आहार घ्यावा लागत आहे. परिणामी, आहारतज्ज्ञांच्या नियुक्तीसाठी एक ठोस धोरण निश्चित करण्याची वेळ आली आहे.

मुंबईकरांना मिळेल पोषक आहारपालिका रुग्णालयांमध्ये गरीब अथवा मध्यमवर्गीय कुटुंबातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे कोणत्या प्रकारचा पोषक आहार घेणे गरजेचे आहे, याचा त्यांना पत्ताच नसतो. रुग्णाला कशा पद्धतीच्या पोषक आहाराची गरज आहे आणि तसा आहार त्याला मिळाला तर रुग्णाच्या प्रकृतीमध्ये झटपट सुधारणा होऊ शकेल. मात्र आहारतज्ज्ञांच्या अपुºया संख्याबळामुळे रुग्णांना आवश्यक तसा पोषक आहार मिळणे दुरपास्त झाले होते. त्यामुळे आता लवकरच आहारतज्ज्ञांच्या नियुक्तीमुळे मुंबईकरांना पोषक आहार मिळेल.- डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग (पालिका)