मिल्लत नर्सिंग होम येथील डायलिसिस केंद्र आज पासून पुन्हा सुरू; 254 डायलिसिस रुग्णांना मिळाला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 02:05 PM2020-04-08T14:05:19+5:302020-04-08T14:06:17+5:30

लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था बंद आहे.त्यामुळे आपले दर आठवड्यात होणारे डायलिसिस कुठे करायचे,यासाठी कोणाला संपर्क साधायचा ही मोठी समस्या त्यांच्यापुढे उभी होती.

Dialysis Center at Millat Nursing Home resumes today; 254 Greater comfort for dialysis patients | मिल्लत नर्सिंग होम येथील डायलिसिस केंद्र आज पासून पुन्हा सुरू; 254 डायलिसिस रुग्णांना मिळाला मोठा दिलासा

मिल्लत नर्सिंग होम येथील डायलिसिस केंद्र आज पासून पुन्हा सुरू; 254 डायलिसिस रुग्णांना मिळाला मोठा दिलासा

Next

- मनोहर कुंभेजकर

मुंबई- जोगेश्वरी पश्चिम मिल्लत नर्सिंग होम येथील डायलिसिस केंद्र आज दुपारी 12 पासून पुन्हा सुरू झाल्याने येथील 254 डायलिसिस रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.येथील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पालिका प्रशासनाने येथील डायलिसिस केंद्रच गेल्या रविवार पासून बंद केले होते.त्यामुळे येथील डायलिसिस करणारे 254 रुग्ण हवालदिल झाले होते. लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था बंद आहे.त्यामुळे आपले दर आठवड्यात होणारे डायलिसिस कुठे करायचे,यासाठी कोणाला संपर्क साधायचा ही मोठी समस्या त्यांच्यापुढे उभी होती.अखेर आजपासून येथील डायलिसीस केंद्र सुरू झाले असल्याने येथील 254  डायलिसिस रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकमत ऑनलाईनला गेल्या सोमवारी रात्री सर्वप्रथम सदर वृत्त ब्रेक करून राज्य शासन व पालिका प्रशासनाच्या नजरेत ही बाब आणल्याबद्धल वॉचडॉग फाऊंडेशनचे विश्वस्त अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेटा व निकोलस अल्मेडा यांनी लोकमतला धन्यवाद दिले आहेत. प्रभाग क्रमांक 62 चे शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक राजू पेडणेकर यांनी मिल्लत नर्सिंग होम येथील डायलिसिस केंद्र आज  दुपारी 12 पासून पुन्हा सुरू झाल्यावर लगेच लोकमतच्या सदर प्रतिनिधीला फोन करून या शुभवर्तमानाची बातमी दिली.

नगरसेवक राजू पेडणेकर सांगितले की,येथील डायलिसीस केंद्र बंद झाल्यावर लगेच आपण या गंभीर प्रकरणाचा पाठपुरावा करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच उपनगराचे पालक आदित्य ठाकरे ,परिवहन मंत्री अँड.अनिल परब व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला.तसेच महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी,अतिरिक्त आयुक्त(आरोग्य विभाग)  सुरेश काकाणी, उपायुक्त रमेश पवार ,मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.पद्मजा केसकर ,उप आरोग्य अधिकारी गोमारे मॅडम,परिमंडळ 4 चे उपायुक्त रणजित ढाकणे, सहाय्यक आयुक्त के पश्चिम  विश्वास मोटे, वैद्यकीय अधिकारी के पश्चिम डॉ. गुलनार खान या सर्व अधिकाऱ्यांनी या दोन दिवसात केलेल्या विशेष सहकार्याबद्दल संपूर्ण जोगेश्वरी करांच्या वतीने  नगरसेवक राजू पेडणेकर यांनी पालिका प्रशासनाचे तसेच लोकमतचे देखिल आभार मानले आहेत.

अंधेरी (पूर्व) सहार, मुंबई येथे राहणाऱ्या  सनी फर्नांडिस हा डायलिसिस रुग्ण येथे उपचारासाठी काल येथे गेला असता त्याला उपचार नाकारण्यात आले.हॉस्पिटलच्या विश्वस्तांनी सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे आपण डायलिसिस करणार नाही असे जाहिर केले होते. त्यामुळे हा रुग्ण आजूबाजूच्या सर्व रुग्णालयांत तुम्ही तरी डायलिसिस कराल का,अश्या विनवण्या करत असल्याची धक्कादायक माहिती प्रथम अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेटा व निकोलस अल्मेडा यांनी लोकमतला दिली होती.

दरम्यान वर्सोवा विधानसभेच्या आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी सांगितले की,आपण येथील डायलिसिस केंद्र बंद झाल्यावर ते लवकर सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी पत्रव्यवहार केला.तसेच पालिका प्रशासनाशी देखिल संपर्क साधला.हॉस्पिटल बंद झाल्यावर पहिल्या दिवसपासून आपण येथील प्रशासनाशी सतत संपर्कात होतो अशी माहिती त्यांनी दिली.

याप्रकरणी पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.पद्मजा केसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,येथील हॉस्पिटल सुरू होण्यापूर्वी संपूर्ण हॉस्पिटल आणि डायलिसिस मशीन्ससचे निर्जंतुकिकरण करण्यात आले.तसेच येथील 43 स्टाफची कोरोना टेस्ट करण्यात आली.त्यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट जरी निगेटिव्ह आला असला तरी,त्यांना 14 दिवस होम क्वारेंटाईन करण्याचे आदेश हॉस्पिटल प्रशासनाला देण्यात आले आहे.आणि नवीन स्टाफ घेऊन येथील हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पालिकेने परवानगी दिली अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान या हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तल्हा जुख्खा यांच्याशी संपर्क साधला असता येथील 9 डायलिसीस मशिन्स आज दुपारी 12 पासून सुरू झाली असून अर्ध्या तासाच्या टप्य्याने येथील सर्व 143 सर्व डायलिसिस मशीन टप्याटप्य्याने सुरू होतील.त्यामुळे येथील 243 डायलिसीस रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Web Title: Dialysis Center at Millat Nursing Home resumes today; 254 Greater comfort for dialysis patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.