Join us  

ध्रुव गाेयल यांचे भाषण भाेवले, विद्यापीठाने तत्काळ आदेश काढले

By रेश्मा शिवडेकर | Published: March 27, 2024 7:18 AM

ठाकूर कॉलेजला दिली कारणे दाखवा

मुंबई : कांदिवलीच्या ठाकूर कॉलेजमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उत्तर मुंबईतील लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पीयूष गोयल यांचे चिरंजीव ध्रुव गोयल यांच्या भाषणाला विद्यार्थ्यांना बळजबरीने बसविण्याच्या प्रकार काॅलेजच्या अंगाशी आला आहे.  मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्ती वा नेत्यांना प्रचारासाठी बाेलावू नये, अशी सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना केली आहे. २३ मार्च रोजी ध्रुव गोयल यांच्या भाषणाला सक्तीने बसविण्यात आल्याचा विद्यार्थ्यांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर शिवसेनाप्रणीत (उबाठा) युवा सेनेच्या नेत्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुळकर्णी यांची भेट घेत ठाकूर कॉलेजवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयाला पत्र पाठवून झालेल्या प्रकाराबाबत तीन दिवसांच्या आत खुलासा करण्यास सांगितले आहे.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना त्यांना वेठीस धरून निवडणूक प्रचारासाठी बळजबरीने महाविद्यालयाच्या सभागृहात बसवून ठेवण्यात आले. भाजप उमेदवार पीयूष गोयल यांचे चिरंजीव ध्रुव यांनी महाविद्यालय प्रशासनाला हाताशी धरून प्रचार केल्याचा आरोप युवा सेनेच्या माजी सिनेट सदस्यांनी केला. याची दखल घेऊन कॉलेजवर कारवाईची मागणी केली होती. 

त्यावर विद्यापीठाने  सर्वच संलग्नीत महाविद्यालयांना परिपत्रक काढून राजकीय प्रचारापासून दूर राहण्याची सूचना केली. या पत्रानंतर युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, मिलिंद साटम, डॉ. धनराज कोहचाडे, किसन सावंत, स्नेहा गवळी, शिवसेना उपनेत्या शीतल देवरुखकर यांनी कुलगुरूंची भेट घेत कारवाईची मागणी केली.

त्यांच्यावर आकसाने कारवाई नकोज्या विद्यार्थ्यांनी या प्रकाराविरोधात आवाज उठवला, त्यांच्यावर आकसाने कारवाई होणार नाही, याची काळजी विद्यापीठाने घ्यावी, अशी सूचना युवा सेनेने केली आहे. त्यावर, अशी खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले आहे.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४पीयुष गोयल