Join us  

धारावीच्या पारंपारिक होळीत रंगला पुनर्विकासाच्या पालखीचा सोहळा; पुनर्विकासाच्या समर्थनार्थ अभिनेते दिगंबर नाईक यांचे गाऱ्हाणे

By मनोहर कुंभेजकर | Published: March 25, 2024 4:44 PM

या होळी महोत्सवात होळीभोवती नाचवण्यात आलेल्या पालखीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या पालखीत गणरायाच्या समोर धारावी पुनर्विकास प्रकल्पात स्थानिकांना मिळणाऱ्या नव्या घराचे प्रतीक म्हणून एक घर उभारण्यात आले होते.

मुंबई : देशभर मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जात असताना धारावीच्या पारंपारिक होळीत धारावी पुनर्विकासाची पालखी स्थानिकांनी नाचवली. धारावीच्या गणेश विद्या मंदिरात संत कक्कया विकास संस्था, फौजी क्रीडा मंडळ आणि धारावी पुनर्विकास समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पारंपारिक होळी महोत्सवात स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी धारावी पुनर्विकासाबाबत असणारे गैरसमज, अफवा आणि स्वार्थी राजकारण यांची होळी पेटवली. तर अभिनेते दिगंबर नाईक यांनी धारावी पुनर्विकासाच्या समर्थनार्थ गाऱ्हाणे घातले. यावेळी माजी नगरसेविका पुष्पा कोळी,माजी नगरसेवक कुणाल माने, शिवसेना पदाधिकारी प्रवीण जैन, रिडान फर्नांडो, समन्वय समितीचे मिलिंद तुळसकर, किरण व्हटकर, भास्कर शेट्टी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. 

पारंपारिक वेशभूषेतील कोळी बांधव - भगिनी, शिमग्याला नाचणारा शंकासुर, पताकांची सजावट, फुलांनी सजवलेली पालखी आणि मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रसन्न वातावरणात धारावीच्या गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळेत होळीचा महोत्सव रंगला. धारावीतील स्थानिकांनी आयोजित केलेल्या या महोत्सवातून धारावी पुनर्विकासाबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यात आली. 'एकच ध्यास ,धारावीचा पुनर्विकास' , 'धारावीतील प्रत्येकाला मिळणार हक्काचे घर' यांसह विविध संदेश देणारे बॅनर कार्यक्रमस्थळी स्थानिकांच्या वतीने लावण्यात आले होते. खासदार राहुल शेवाळे यांना कोळी बांधवांची टोपी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर पारंपारिक पद्धतीने होळीचे पूजन करण्यात आले. अभिनेते दिगंबर नाईक यांनी होळीसमोर घातलेल्या विशेष गाऱ्हाण्याने होळीची रंगत आणखीनच वाढवली. या पारंपारिक होळीचे दहन केल्यावर स्थानिकांनी याच ठिकाणी धुळवड खेळायला सुरुवात केली.

धारावी पुनर्विकासाची पालखी

या होळी महोत्सवात होळीभोवती नाचवण्यात आलेल्या पालखीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या पालखीत गणरायाच्या समोर धारावी पुनर्विकास प्रकल्पात स्थानिकांना मिळणाऱ्या नव्या घराचे प्रतीक म्हणून एक घर उभारण्यात आले होते. यावर 'धारावी पुनर्विकास' असा संदेश लिहिण्यात आला होता. स्थानिकांनी ही पालखी खासदार राहुल शेवाळे यांच्या खांद्यावर देऊन होळी भोवती फेर धरायला लावले.