धारावी-घाटकोपर जलबोगद्याला मंजुरी; सांडपाणी प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी वाहून नेण्यास गती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 12:00 IST2025-12-07T11:59:34+5:302025-12-07T12:00:41+5:30
मुंबई महापालिकेने वरळी, वांद्रे, मालाड, वर्सोवा, धारावी, घाटकोपर आणि भांडुप येथे एकूण २,४६४ एमएलडी क्षमतेची आधुनिक मलजल प्रक्रिया केंद्रे उभारण्याचे काम सुरू केले आहे.

धारावी-घाटकोपर जलबोगद्याला मंजुरी; सांडपाणी प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी वाहून नेण्यास गती
मुंबई : धारावी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ते घाटकोपर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पापर्यंतच्या जलबोगद्याला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या जलबोगद्याच्या बांधकाम प्रकल्पाला आता गती मिळणार असून या परिसराला लवकरच दिलासा मिळणार आहे.
मुंबई महापालिकेने वरळी, वांद्रे, मालाड, वर्सोवा, धारावी, घाटकोपर आणि भांडुप येथे एकूण २,४६४ एमएलडी क्षमतेची आधुनिक मलजल प्रक्रिया केंद्रे उभारण्याचे काम सुरू केले आहे. ही केंद्रे कार्यान्वित झाल्यानंतर त्यापैकी १,२३२ एमएलडी पाणी प्रक्रियेने पुनर्वापरासाठी तयार केले जाणार असून उर्वरित पाणी दुय्यम प्रक्रियेनंतर समुद्रात सोडले जाईल. सांडपाण्यावर तृतीय स्तराची प्रक्रिया केलेले पाणी धारावी- घाटकोपर- भांडुपमार्गे जमिनीखालून जलबोगद्यातून भांडुप संकुलात नेण्याचे पालिकेचे नियोजन आहे. तिथे आधुनिक सुविधांच्या साहाय्याने ते पिण्यायोग्य करण्याचा प्रस्ताव असून यासाठी माहितीपूर्ण अहवाल आणि तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.
दरम्यान हे प्रक्रिया केलेले पाणी आजूबाजूच्या परिसरात नेण्यासाठी पालिकेकडून धारावी ते घाटकोपर असा जलबोगदा बांधला जाणार आहे.
जमिनीखाली १७६ मीटर खोलीवर बाेगदा
वेलस्पुन मिचिगन इंजिनिअर्स लिमिटेड ही कंपनी या जलबोगद्याचा प्रकल्प राबवणार असून एकूण लांबी ८. ४८ किमी आणि व्यास ३. ५ मीटर आहे. तो जमिनीखाली १४३ ते १७६ मीटर खोलीवर बांधला जाणार आहे.
त्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता ४१६ एमएलडी इतकी असणार आहे. यासाठी सुमारे २ हजार कोटींचा खर्च येणार असून पर्यावरण व्यवस्थापनासाठी ५९. १४ लाखांचा स्वतंत्र निधी राखून ठेवण्यात आला आहे.
लवकरच बांधकामाला सुरुवात
संकल्पचित्र आणि बांधकामाला सीआरझेडची मंजुरी मिळाल्याने लवकरच उभारणीला सुरुवात होईल, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.