Join us  

धारावी पुन्हा शून्यावर, दहा सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत धारावीने पुन्हा बाजी मारली आहे. गेल्या महिन्यात शून्य रुग्णसंख्या नोंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत धारावीने पुन्हा बाजी मारली आहे. गेल्या महिन्यात शून्य रुग्णसंख्या नोंद झालेल्या धारावीत शुक्रवारी पुन्हा एकही बाधित रुग्ण सापडला नाही. तसेच आता केवळ दहा सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे आशिया खंडातील ही सर्वांत मोठी झोपडपट्टी कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे.

एप्रिल महिन्यात येथे पहिला बाधित रुग्ण आढळून आला होता, तर तब्बल नऊ महिन्यांनंतर २५ डिसेंबर रोजी धारावीत एकही बाधित रुग्ण सापडला नव्हता. मुंबईतील सर्व व्यवहार हळूहळू सुरू होत असल्याने काही विभागांमध्ये बाधित रुग्णांची संख्या किंचित वाढल्याचे दिसून येते. मात्र धारावीने आजही कमी रुग्णसंख्येचा आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे.

अडीच चौरस किलोमीटर वस्तीमध्ये दाटीवाटीने वसलेली साडेआठ लाख एवढी येथील लोकसंख्या आहे. अशा धारावीच्या झोपडपट्टीत कोरोनाचा संसर्ग रोखणे पालिकेसाठी मोठे आव्हान होते. मात्र पालिकने करून दाखवले आणि त्यामुळेच आज याच धारावी पॅटर्नचे जगात कौतुक हाेत आहे. प्रतिबंधात्मक उपाय, सर्व खबरदारीबरोबरच समुदायाचा सहभाग आणि चिकाटी हेच धारावी पॅटर्नचे यश असल्याचे सांगत जागतिक बँकेने या पॅटर्नचे कौतुक केले, तर धारावीत यशस्वी ठरलेली ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम फिलिपिन्स सरकार तेथील झोपडपट्ट्यांमध्ये राबवित आहे.

* जी उत्तर विभागातील आजची स्थिती

परिसर-एकूण रुग्ण-सक्रिय-डिस्चार्ज-आजचे रुग्ण

दादर -४,९०० -८२ -४,६४५ -०२

माहीम -४,७३१ -१०१ -४,४८६ -०३

धारावी -३,९०४ -१० -३,५८२ - ००

--------------------