Join us  

कारवाईच्या निषेधार्थ धनगर समाज मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 4:50 AM

अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती सोहळ््यादरम्यान धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या ५० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती सोहळ््यादरम्यान धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या ५० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते सर्व खोटे असल्याचा आरोप करत संघर्ष समितीने सोमवारी आझाद मैदानात निदर्शने केली. शिवाय सर्व गुन्हे तत्काळ मागे घेण्याची मागणी केली.संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी यासंदर्भात मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली. त्यात कांबळे म्हणाले की, चौंडी येथे राज्यमंत्री राम शिंदे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती सोहळ््याचे आयोजन केले होते. तिथे धनगर आरक्षण कधी देणार? अशा विषयाच्या टोप्या घातलेले संघर्ष समितीचे कार्यकर्ते सामील झाले होते. लोकशाही मार्गाने जाब विचारणाऱ्या या कार्यकर्त्यांविरोधात सरकारने सूडबुद्धीने ‘शासकीय कामात व्यत्यय आणला’ आणि ‘खूनाचा प्रयत्न’ असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. मुळात शिंदे यांच्याकडून आयोजित केलेली जयंती सोहळा हा शासकीय कार्यक्रम नाही. तरीही शासकीय कामकाजात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. कार्यकर्त्यांनी कोणतीही चूक केलेली नसताना खूनाचे गुन्हे दाखल केले गेले. त्यामुळे समाजात संतप्त प्रतिक्रिया उठत आहेत.महत्त्वाची बाब म्हणजे ५० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करताना १६ कार्यकर्त्यांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे अद्याप संबंधित कार्यकर्ते तुरूंगात आहेत. तरी सरकारने तत्काळ कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेत सुटका केली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी दिला आहे.