Join us  

गोराई गावाचा विकास खुंटला

By admin | Published: December 18, 2014 1:23 AM

एकीकडे शहरांचा झपाट्याने विकास होत असताना बोरीवली पश्चिमेकडे असलेल्या गोराई गावाचा विकास मात्र गेली कित्येक वर्षे खुंटला आहे.

जयाज्योती पेडणेकर, बोरीवलीएकीकडे शहरांचा झपाट्याने विकास होत असताना बोरीवली पश्चिमेकडे असलेल्या गोराई गावाचा विकास मात्र गेली कित्येक वर्षे खुंटला आहे. वर्षानुवर्षे स्थानिक गोराई गावाकडे शासनाने नेहमीच दुर्लक्ष करत या गावाच्या विकासाला स्पर्शही केलेला नाही. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या राहत असलेल्या गोराई गावचे रहिवासी कमालीच्या मेटाकुटीला आले आहेत. रस्ते, वीज, पाणी, रुग्णालय, स्मशानभूमी या मूलभूत नागरी सुविधा आजवर गोराईत उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. बाभरपाडा, हौदपाडा, जमदारपाडा, छोटी डोंगरी, मोठी डोंगरी, मुंडा पाडा हे गोराई गावातील सहा आदिवासी पाडे आहेत. या पाड्यांत वीज नसल्यामुळे या परिसरातील मुले दिव्याखाली अभ्यास करतात. पाण्याची जोडणी पालिकेने केली, मात्र नळाला अद्याप पाण्याचा थेंब आलेला नाही. विशेष म्हणजे टिपूसभर पाणी आलेले नसताना बिल मात्र वेळच्या वेळी नागरिकांच्या माथी मारले जाते. गोराई गावात असलेल्या तीन तलाव व एका बावडीतून पाणी पिण्याशिवाय गावकऱ्यांसमोर अन्य कोणताही पर्याय नाही. गावातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर समुद्रकिनारी उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नसतो. गावात पालिकेचा एकच दवाखाना आहे. तो सकाळी नऊ वाजता सुरू होतो आणि संध्याकाळी चार वाजता बंद होतो. दवाखाना असूनही इंजेक्शन, औषधांचा साठा नाही. एखाद्या वेळी सर्पदंश झाल्यास उपचाराची सोय नाही किंवा कोणी आजारी पडल्यास त्या रु ग्णाला १८ किलोमीटर अंतर पार करून कांदिवली येथील शताब्दी रुग्णालय गाठावे लागते. गरोदर महिलांची अवस्था तर त्याहून बिकट बनते. गावातील रहिवासी गोराई खाडीतील बोटीने दररोज प्रवास करतात, रात्री साडेदहाला बोट बंद होते. तेव्हा रहिवाशांना भार्इंदरमार्गे घर गाठावे लागते. गोराई गावात एक तरी शासकीय रु ग्णालय बांधण्यात यावे, याकरिता स्थानिक नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी आर मध्य पालिका प्रभाग समितीच्या बैठकीत या समस्यांबाबत वेळोवेळी आवाज उठविला. मात्र पालिका प्रशासनाने आश्वासन देत आजवर केवळ वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. (प्रतिनिधी)