Join us  

उड्डाणपुलांखाली साकारणार विरंगुळ्याचे विश्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:18 AM

मुंबईतील उड्डाणपुलांखालील जागा गर्दुल्ले, भिकारी, फेरीवाले यांच्यासाठी आश्रयस्थान बनले़, अनधिकृत वाहनतळ, बेवारस गाड्या, कचराकुंडी अशा पद्धतीने अतिक्रमण झाले आहे़ याची गंभीर दखल घेऊन उड्डाणपुलांखालील जागांचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला़ उड्डाणपुलांखालील वाहनतळांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हलविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले़ त्यानंतर, माटुंगा येथील नानालाल मेहता उड्डाणपुलाखालील जागेत २०१६ मध्ये ७,२०० चौरस मीटर क्षेत्रफळावर उद्यान विकसित करण्यात आले़ हाच प्रयोग अन्य उड्डाणपुलांखाली राबविण्यात येणार आहे़ उड्डाणपुलाखाली सध्या काय आहे, याचा ‘लोकमत’ टीमने घेतलेला आढावा...

मुंबई : वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी बांधलेल्या उड्डाणपुलांनी मुंबईकरांना दिलासा दिला खरा. इंधन आणि वेळेमध्येही मोठी बचत होऊ लागली. मात्र, उड्डाणपुलांखालची मोकळी जागा डोकेदुखीचे कारण ठरू लागली़ या पुलाखालील अतिक्रमण, गैरकारभार वाढल्यामुळे धोका वाढला, तसेच पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे उड्डाणपुलांखाली वसलेले हे अनैतिक जग उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक अभिनव कल्पना आता प्रत्यक्षात अवतरू लागल्या आहेत. काही उड्डाणपुलांखाली उभी उद्याने बहरली, बागा खुलल्या, अशा पद्धतीने मुंबईकरांसाठी विरंगुळ्याचे नवीन दालनच खुले झाले आहे.

मुंबईत एकूण ३१४ पूल बांधण्यात आले आहेत. यामध्ये रेल्वेवरील पूल, पादचारी पूल, नदी-नाल्यांवरील पूल आणि उड्डाणपुलांचा समावेश आहे. १९६५ मध्ये केम्स कॉर्नर हा पहिला उड्डाणपूल बांधण्यात आला. राज्य सरकारने मुंबई महानगर प्रादेशिक प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) बांधलेल्या काही पुलांच्या देखभालीची जबाबदारी कालांतराने मुंबई महापालिकेवर आली. असे महापालिकेचे आणि एमएमआरडीएकडून ताब्यात आलेले एकूण १७ उड्डाणपूल आहेत़

सन २०१५ मध्ये महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. त्यानुसार, सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले. पेडर रोड, केम्स कॉर्नर हा मुंबईतील सर्वात पहिला उड्डाणपूल आहे. १९६५ मध्ये या पुलाचे बांधकाम झाले. मात्र,सहा महिन्यांपूर्वी या उड्डाणपुलाला तडे गेल्याचे लक्षात आले. पूल सुरक्षित असल्याचे पालिकेच्या पूल विभागाने जाहीर केले. खबरदारी म्हणून या पुलाचे लवकरच आॅडिट होणार आहे़लालबाग उड्डाणपुलाची होणार दुरुस्तीमुंबईतील दुसरा मोठा उड्डाणपूल असलेल्या लालबाग येथील पुलाला दोन वर्षांपूर्वी तडे गेले़ या पुलाचे बांधकाम जेमतेम सहा ते सात वर्षांपूर्वीच झाले असल्याने या पुलाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त होऊ लागला़एमएमआरडीने २०११ मध्ये बांधलेला हा उड्डाण पूल २़४५ किमी आहे़ परळ ते जिजामाता उद्यानापर्यंत हा उड्डाणपूल जातो़ या पुलावर खड्डे पडले़, अपघाताचे प्रमाण वाढले़ यामुळे धोकादायक ठरलेल्या या पुलाच्या दुरुस्तीचा निर्णय महापालिकेने घेतला़ त्यावर, या पुलाची रिसर्फेसिंग करण्यात आले, तसेच स्ट्रक्चरल दुरुस्तीसाठी तब्बल १८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत़जेजे उड्डाणपुलाच्या खाली बेघर लोकांनी मुक्काम ठोकला आहे़ पुलाखाली दुचाकी, चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर पार्किंग केले जाते़ येथे गर्दुल्लेही असतात़ पुलाखाली काही ठिकाणी झाडे लावण्यासाठी जागा आहे. मात्र, काही झाडे सुकलेली, तर काही ठिकाणी झाडेच नाहीत. उड्डाणपुलाच्या खाली बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. पुलाखाली राजकीय नेत्यांच्या बॅनरचे साम्राज्य आहे़ त्यामुळे येथील परिसर विद्रूप झाला आहे़ पोलिसांनी पळवून लावल्यानंतर काही दिवस येथे गर्दुल्ले नसतात़

टॅग्स :मुंबई