Join us

मत्स्य व्यवसायातून साधला विकास

By admin | Updated: May 13, 2015 23:56 IST

अरबी समुद्रात ओनजीसीकडून तेल सर्वेक्षण आणि तांत्रिक पद्धतीच्या मासेमारीमुळे काही वर्षांपासून मत्स्य दुष्काळाचा प्रश्न निर्माण झाला

बोर्डी : अरबी समुद्रात ओनजीसीकडून तेल सर्वेक्षण आणि तांत्रिक पद्धतीच्या मासेमारीमुळे काही वर्षांपासून मत्स्य दुष्काळाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे मासेमारी व्यवसायिकांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली. मात्र बोर्डी परिसर याला अपवाद ठरला आहे. झाई गावातील यज्ञेश वसंत सावे यांनी सहकारी संस्थेची स्थापना करून अनेकांना रोजगार देऊन स्वत:चीही प्रगती साधली आहे.महाराष्ट्राला ७२० कि. मी. लांबीचा अरबी समुद्रकिनारा लाभला. त्यामुळे कोकणाला खरी ओळख प्राप्त झाली. पारंपारिक आणि आधुनिक पद्धतीच्या मासेमारीतूर लाखो मेट्रिक टन उत्पादन घेतले जाते. या व्यवसायाशी प्रत्यक्ष आणि जोडधंद्याद्वारे निगडीत असलेल्यांचे प्रमाण अधिक आहे. या निर्यातक्षम व्यवसायातून कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन प्राप्त होते. मात्र यांत्रिक मासेमारी नौकांचा अतिवापर आणि पर्सनेट जाळीचा अवलंब केल्याने मासेमारी हंगामात मत्स्य दुष्काळाची समस्या निर्माण झाली आहे. तेल कंपन्यांच्या सर्वेक्षण मोहिमेमुळे या व्यवसायावर गदा आली. सरंगा, रावस, घोळ, दाढा, वाम, शिवंड, मुशी आदी माशांचा तुटवडा भासत असून भावही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य खवय्यांना माशांची चव चाखणे कठिण झाले आहे.झाई गावातील यज्ञेश वसंत सावे यांनी १९७५ मध्ये मत्स्य व्यवसायाला प्रारंभ केला. प्रथम त्यांनी मत्स्य व्यवसाय विकास सहकारी सोसायटीची स्थापन केली. प्रारंभी मत्स्य शेतीकरिता पाटबंधारे विभागाकडून धरण घेतले. ग्रामपंचायतीकडून लिलाव पद्धतीने तलाव घेऊन, रोहू, कटला, मृगळ, सिल्वर ब्रिगेड, ग्रास्कोप, नंदी, कोलंबी आदी माशांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊन निर्यात सुरु केली. स्थानिक पातळीवर रविवार, बुधवार आणि शुक्रवारी माशांची प्रतिकिलो १५० रुपये प्रमाणे विक्री सुरु केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कमी भावात विविध प्रकारच्या माशांची चव चाखता येऊ लागली.विशेष म्हणजे, रोजगार उपलब्ध झाल्याने काही प्रमाणात येथील स्थलांतर थांबले आहे. मत्स्य व्यवसायातून आर्थिक उलाढालही वाढली आहे. प्रगतीशील शेती व मत्स्य शेतीची दखल घेऊन शासनाने अनेक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला आहे. (वार्ताहर)