Join us  

पहिली ते सातवीचे वर्ग प्रत्यक्षात भरविण्यासाठी शिक्षण विभागाचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:06 AM

मुंबई : राज्यात ८ वी ते १२ वीचे प्रत्यक्ष वर्ग टप्प्याटप्प्याने १५ जुलैपासून सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली ...

मुंबई : राज्यात ८ वी ते १२ वीचे प्रत्यक्ष वर्ग टप्प्याटप्प्याने १५ जुलैपासून सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली असून त्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील इतर वर्गांच्या शाळा सुरू करण्याबाबत पालकांचे काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या एससीईआरटीकडून एक सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. ८ प्रश्नांचा समावेश असलेल्या या सर्वेक्षणात पालकांना आपल्या पाल्याची शाळा कोणत्या भागात आहे, हे सांगून शाळा सुरू करण्यात आल्यानंतर आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यासंदर्भातील संमती हो किंवा नाहीमध्ये नोंदवायची आहे. हे सर्वेक्षण १२ जुलै २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय कोविड काळात सुरक्षित असला तरी शैक्षणिक हितासाठी तो परिणामकारक नसल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यात १५ जुलैपासून आवश्यक ती काळजी घेऊन टप्प्याटप्य्याने वर्ग सुरू करण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली आहे. यामुळे शाळा सुरू होण्याची वाट पाहणारे इतर विद्यार्थीही त्यांचे वर्ग सुरू करण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अनेक भागांतील विद्यार्थ्यांकडे इंटरनेट आणि स्मार्टफोन सुविधा नसल्याने त्यांच्या ऑनलाइन शिक्षणात अडथळे येत आहेत. त्यामुळे हे विद्यार्थीही प्रत्यक्ष शाळा भरून आपल्याला पुन्हा शिक्षण प्रवाहात कसे आणि केव्हा येता येईल याची वाट पाहत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाकडून हे सर्वेक्षण हाती घेतले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मुख्याध्यापकांचे प्रश्न कायम

राज्यात ८ वी ते १२ वीच्या वर्गांच्या ज्या शाळा सुरू होणार आहेत त्याबद्दल मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ज्या शाळा सुरू होतील तेथील शिक्षकांनी त्या गावातच राहणे अपेक्षित आहे. शिक्षकांसाठी हे नियम असताना जे विद्यार्थी इतर गाव आणि इतर ग्रामपंचायत हद्दीतून येणार आहेत त्यांच्यासाठी कायम नियम असावेत, यासंदर्भात स्पष्टीकरण नसल्याने मुख्याध्यापक गोंधळले आहेत, अशी प्रतिक्रिया मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव पांडुरंग केंगार यांनी दिली.