Join us  

डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 3:51 AM

डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची व घरांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची व घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे करण्यात आली. या तपासणीमध्ये १ जानेवारी ते १५ जुलै या साडेसहा महिन्यांच्या कालावधीदरम्यान ७ हजार ५८६ ठिकाणी ‘एडिस एजिप्ती’ या डेंग्यू प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्या; तर २ हजार ६७४ ठिकाणी मलेरिया वाहक ‘एॅनॉफिलीस स्टिफेन्सी’ डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. ही सर्व उत्पत्तीस्थाने तत्काळ नष्ट करण्यात आली आहेत.महापालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते १५ जुलै या साडे सहा महिन्यांच्या कालावधीदरम्यान डेंग्यू नियंत्रणाच्या दृष्टीने ६२ लाख ४३ हजार ५९७ गृहभेटी देण्यात आल्या. यामध्ये काही घरांना गरजेनुरूप एकापेक्षा अधिक वेळा भेटी देण्यात आल्या. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत ८ हजार ७४४ नोटिसा देण्यात आल्या आहेत. या नोटिसा प्रामुख्याने पाण्याची टाकी डास प्रतिबंधक नसणे, विहीर डास प्रतिबंधक न करणे, डास प्रतिबंधाच्या दृष्टीने काळजी न घेणे इत्यादी कारणांसाठी देण्यात येतात. याच सहा महिन्यांच्या कालावधीदरम्यान २० लाख ४ हजार ६०० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, आजारांच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मुंबईतील खासगी आणि महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांचा वाढत असल्याचे चित्र आहे.मलेरियाच्या बाबतीतसुद्धा मलेरियाचे परजीवी पसरविणाऱ्या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातच होते. मात्र या प्रकारच्या डासांची प्राधान्य उत्पत्तीस्थळे ही काही प्रमाणात वेगळी आहेत. उदाहरणार्थ विहिरी, पाण्याच्या टाक्या, कारंजे, कूलिंग टॉवर, पाण्याचे हौद, इमारत बांधकामाच्या ठिकाणी साचवलेले पाणी इत्यादी.गेल्या दोन वर्षांत एकूण डेंग्यूबाधित रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांच्या घरामध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली होती. डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणाऱ्या या डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते.साठलेल्या पाण्यात डासांच्या विविध अवस्था या साधारणपणे आठ दिवसांपर्यंत असतात. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या घरामध्ये व घराशेजारील परिसरात साठविलेले किंवा साचलेले पाणी सात दिवसांपेक्षा अधिक काळ राहणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस घरातील पाणी साठवण्याची भांडी कोरडी ठेवून कोरडा दिवस पाळणेही अतिशय आवश्यक आहे.घराशेजारील परिसरात असणारे टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लॅस्टिक यांसारख्या विविध वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचते व या स्वच्छ पाण्यातही डास अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या निरुपयोगी वस्तू त्वरित नष्ट कराव्यात.सर्वेक्षणातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, डेंग्यू विषाणू वाहक डासांच्या अळ्या प्राधान्याने फेंगशुई झाड, बांबू प्लॅन्ट्स, मनीप्लँट्स यांसारखी शोभिवंत झाडे; घराच्या सज्जामध्ये (गॅलरी) किंवा सभोवताली झाडांच्या कुंड्यांमधील अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या ताटल्या (प्लेट्स), वातानुकूलन यंत्रणा, शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) डिफ्रॉस्ट ट्रे यांसारख्या स्रोतांत अल्प प्रमाणात असलेल्या स्वच्छ पाण्यात या डासांची उत्पत्ती आढळून आली आहे.घराच्या बाहेर पाणी साठवण्यासाठी पिंप वा ड्रम वापरले जातात. यामध्ये डासांच्या अळ्या आढळून येतात. याकरिता पाण्याचे पिंप हे आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडे ठेवावे. यासाठी पिंप पूर्णपणे उलटे करून ठेवल्यानंतर काही वेळाने हे पिंप कोरड्या व स्वच्छ कापडाने आतून पुसावे. कोरड्या फडक्याने पिंप आतून पुसत असताना ते दाब देऊन पुसावे जेणेकरून पिंपाच्या आतील बाजूला चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील. नंतर या पिंपात पाणी भरल्यावर पिंपाचे तोंड कापडाद्वारे बांधून ठेवावे; जेणेकरून पिंपात डासांची मादी अंडी घालू शकणार नाही.रोगांवर नियंत्रण असावे व रोगांच्या प्रसाराला प्रतिबंध व्हावा म्हणून सार्वजनिक आरोग्य खाते, कीटकनाशक खाते यासारखे महापालिकेचे विविध विभाग कार्यरत असतात. तसेच औषध फवारणी, धूम्र फवारणी, डासांची उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करणे, यासारख्या विविध उपाययोजना करण्यात येतात.