Join us

डेंग्यूच्या उत्पत्ती स्थानांचा शोध

By admin | Updated: September 21, 2015 02:32 IST

रविवारी झालेल्या पावसानंतर मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. कारण, मुंबईत डेंग्यूच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळून आले आहे

मुंबई : रविवारी झालेल्या पावसानंतर मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. कारण, मुंबईत डेंग्यूच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळून आले आहे. १९ सप्टेंबर रोजी एका दिवसात पालिकेने २६२ डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थाने शोधून नष्ट केली आहेत. दरवर्षी सप्टेंबर - आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत महापालिकेचे अधिकारी वॉर्डनिहाय पाहणी करीत आहेत. शनिवार, १९ सप्टेंबर रोजी एन विभागाची पाहणी केली. या विभागात २६२ ठिकाणी एडिस इजिप्ती डासांची पैदास होत असल्याचे आढळून आले. ही स्थाने तत्काळ नष्ट करण्यात आली. एका दिवसात पालिका अधिकाऱ्यांनी ७ हजार ४० घरांची, तर ६ हजार ७६५ साठवण टाक्यांची तपासणी केली. या परिसराची पाहणी करीत असताना पाणी साठून डासांची उत्पत्ती होईल, अशा वस्तू काढून टाकण्यात आल्या. यात ८ टायर्सदेखील काढून टाकण्यात आले. त्याचप्रमाणे घाटकोपर पूर्व परिसरातील पंत नगरमध्ये असणाऱ्या बेस्ट कर्मचारी वसाहतीमध्ये २५ स्थानिक नागरिकांना डास अळी शोधकाचे (स्वयंसेवक) प्रशिक्षण देण्यात आले.घाटकोपरच्या एन विभागातील पंत नगर, बेस्ट कर्मचारी वसाहत, इंदिरा नगर, गोळीबार मार्ग आणि चिराग नगर परिसरात डेंग्यू रोखण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत ८ घरांमधील ८ साठवणींच्या टाक्यांमध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले. पावसामुळे वातावरणात होणारे बदल आणि दमट हवामान हे डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक असतात. एखाद्या ठिकाणी ८ दिवसांहून अधिक काळ पाणी साठून राहिल्यास त्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. एखाद्या वेळी पिंप, टाक्यांमध्ये पाणी साठवून बंद करून ठेवले जाते. पण, छोटीशी फटदेखील राहिल्यास त्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ शकते. यामुळे नागरिकांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. घरातील मनीप्लॅण्ट, फेंगशुईच्या वस्तू, झाडांच्या खाली ठेवण्यात आलेल्या ताटल्या, फ्रीज, एसी या ठिकाणी पाणी साचते.