Join us  

मीरा भाईंदरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चात 'लव्ह जिहाद' विरोधात कारवाईची मागणी

By धीरज परब | Published: March 12, 2023 11:18 PM

सुमारे २ हजार लोकांचा जमाव मोर्चात उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड- लव्ह जिहाद , लँड जिहाद , धर्मांतरण वर कठोर कारवाई करून कायदे करा अशी मागणी करत भाईंदरच्या गोल्डन नेस्ट पोलीस चौकी पासून एस के स्टोन पोलीस चौकी पर्यंत हिंदू जनआक्रोश म्हणून रविवारी मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा मध्ये आमदार गीता जैन  व नितेश राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष ऍड . रवी व्यास , माजी आमदार नरेंद्र मेहतासह अनेक भाजपा पदाधिकारी व माजी नगरसेवक  , कार्यकर्ते जास्त संख्येने होते . मनसेचे संदीप राणे व ठाकरे गटाचे शैलेश पांडेय सह अन्य लोक सहभागी झाले होते . सुमारे २ हजार लोकांचा जमाव मोर्चात उपस्थित असल्याचा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तवला .  . मोर्चा नंतर एस के स्टोन चौकी जवळील मंडपात सभा घेण्यात आली . यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . 

 यावेळी राजकीय नेत्यांना व्यासपीठावर स्थान न देता खाली पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते .  विशिष्ट धर्मियां कडून चालणारे लव्ह जिहाद , लँड जिहाद , धर्मांतरण बंद झालेच पाहिजे व त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कायदा करावा . लँड जिहाद म्हणजे सरकारी जमिनी बळकावून केलेली बेकायदा धार्मिक स्थळांची बांधकामे  तोडली पाहिजेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या . यावेळी भाईंदरच्या तरोडी - चौक मार्गावरील सीआरझेडचे उल्लंघन करून सरकारी जागेत बांधलेले धार्मिक स्थळ असो वा मीरारोड मध्ये पोलिसांच्या आरक्षित जागेतबांधलेले धार्मिक स्थळ हा लँड जिहादचा भाग असल्याचा आरोप करत तोडक कारवाईची मागणी करण्यात आली . 

नेत्यांच्या सभांना गर्दी करून , झाडे लावताना फोटो काढणे म्हणजे महिला सशक्तीकरण नव्हे असे सांगत बॉलिवूड , एकता कपूर व ओटीटी प्लॅटफॉर्मने महिलांना बिघडवण्याचे काम चालवल्याची टीका काजल शिंगाला यांनी भाषणात केली . आजही मुगल काळ चालू आहे असे सांगत अंकिता , श्रद्धा यांची हत्याकांड लव्ह जिहाद असून आमच्या मुलींचे आणखी बळी घेऊ देणार नाही असे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :मीरा रोडलव्ह जिहाद