Join us  

पासपोर्ट पोलीस व्हेरिफिकेशनसाठी सहा हजारांच्या लाचेची मागणी

By मनीषा म्हात्रे | Published: March 28, 2024 7:29 PM

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई निलेश गजानन शिंदे आणि पोलीस हवालदार साहेबराव दत्ताराम जाधव विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 

मुंबई : पासपोर्ट पोलीस व्हेरिफिकेशनसाठी जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनी  अर्जदाराकडे सहा हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईत समोर आले. या कारवाईने खळबळ उडाली असून एसीबीकडून अधिक तपास सुरू आहे.  

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई निलेश गजानन शिंदे आणि पोलीस हवालदार साहेबराव दत्ताराम जाधव विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.  तक्रारदार यांनी त्यांचे पत्नी व मुलाचे पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज केला होता. पासपोर्ट संदर्भात पडताळणी करण्याकरीता त्यांना सर जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. २२ मार्च रोजी तक्रारदार यांनी पोलीस ठाण्यात पडताळणीसाठी आवश्यक असलेल्या संबंधित कागदपात्रांची पुर्तता केली होती. या कागपत्रांची पडताळणी केली असता, तक्रारदार यांची पत्नी व मुलगा हे आधारकार्डवर नमूद पत्त्यावर राहत नसल्याने, नमूद पत्त्यावर ते राहत असल्याचे दाखवून पडताळणी कार्यवाही पूर्ण करण्यासाठी शिंदेने त्यांच्याकडे ६ हजारांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २६ मार्च रोजी  एसीबीकडे तक्रार दिली. 

पडताळणीत शिंदेने तडजोडीअंती ५ हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने बुधवारी केलेल्या  सापळा कारवाई दरम्यान शिंदेने सांगितल्या प्रमाणे तक्रारदार यांनी ती रक्कम त्यांच्या टेबलच्या खालील ड्रॉवर मध्ये ठेवली. त्यानंतर, जाधवने ती रक्कम ड्रॉवरमधून काढून एका काळया रंगाच्या प्लॅस्टीक पिशवीत ठेवून ड्रॉवरच्या खालील कप्प्यात ठेवून लाच स्वीकारण्यास मदत केल्याचे दिसून येताच दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

टॅग्स :मुंबईलाच प्रकरण