Join us  

अंगणेवाडी जत्रेसाठी मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 8:10 PM

अंगणेवाडीच्या जत्रेला नेहमीच विविध भागातून नागरिक मोठ्या संस्थेने येतात. त्यातच २६ जानेवारी आणि शनिवार आणि रविवार असा लागू आल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी होऊ नये, यासाठी आमदारांनी खबरदारी घेतली आहे.

ठळक मुद्दे२७-२८ जानेवारी अंगणेवाडी जत्रात्यातच २६ जानेवारीची लागून आलेली सुट्टी

ठाणे: कोकणाचे आराध्य दैवत असलेल्या प्रसिद्ध श्री आई भराडी देवीच्या अंगणेवाडीची जत्रा २७ -२८ जानेवारी सुरू होत आहे. त्या दोन दिवसांत या जत्रेसाठी मुंबईतून मोठ्या प्रमाणात भाविक येजा करणार आहेत. त्यातच,२६ जानेवारीची सुटी आली आहे. या जत्रेसाठी वाहने घेऊन बाहेर पडणा-या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी २७ ते २८ जानेवारी दरम्यान मुंबई-गोवा या महामार्गावर येजा करणारी अवजड वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊल निवेदनाद्वारे केली आहे. तसेच राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचीहीभेट घेऊन सरकारने अंगणवाडीच्या जत्रेसाठी जाणा-या भाविकांची गैरसोय होणार नाही, याची तसदी घ्यावी अशी विनंती केली आहे.सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील मुंबईत वास्तव्यासाठी असलेले चाकरमाणी,अधिकारी, कर्मचारी, राजकीय नेते अशा सर्व थरातील कोकणी लोक मोठ्या श्रद्धेने आई भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी अंगणेवाडीच्या जत्रेला आवर्जुन हजेरी लावतात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर या दोन दिवसात मोठया प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. जर अवजड वाहनांना बंदी घातली तर जत्रेसाठी जाणा-या भाविकांची गैरसोय होणार नाही तसेच व्यापारी वर्गाचे नुकसानही होणार नाही . यामुळे आगाऊ सुचना देऊन अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालावी, अशी मागणी फाटक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

टॅग्स :ठाणेवाहतूक कोंडीरस्ते सुरक्षा