मीटर रीडिंगच्या विलंबामुळे फरक पडल्याने वीज ग्राहकांना शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:07 AM2021-07-28T04:07:20+5:302021-07-28T04:07:20+5:30

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात वीज पुरवठा करत असलेल्या वीज कंपन्यांकडून वीज ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेण्यास विलंब झाल्यामुळे ...

Delay in meter readings shocks power consumers | मीटर रीडिंगच्या विलंबामुळे फरक पडल्याने वीज ग्राहकांना शॉक

मीटर रीडिंगच्या विलंबामुळे फरक पडल्याने वीज ग्राहकांना शॉक

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात वीज पुरवठा करत असलेल्या वीज कंपन्यांकडून वीज ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेण्यास विलंब झाल्यामुळे सवलतीच्या वीजदराच्या स्लॅबमध्ये फरक निर्माण होत असून, या फरकामुळे वीज ग्राहकांना सदर महिन्याचे वीज बिल वाढीव दराने येत आहे. अशा प्रकरणांचे प्रमाण तुलनेने कमी असले तरीदेखील मुसळधार पाऊस, वीज कर्मचाऱ्यांची कमतरता आणि इतर तांत्रिक कारणांमुळे वीज ग्राहकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

वीज कंपन्यांकडून तारखांनुसारच विजेच्या मीटरचे रीडिंग घेतले जाते. यात सहसा कसूर केली जात नाही; मात्र समजा एखादेवेळी मनुष्यबळ कमी असेल, मोठा पाऊस असेल किंवा तांत्रिक अडचणी असतील तेव्हा विजेच्या मीटर रीडिंगमध्ये अडचणी येतात. अशावेळी विजेच्या मीटरचे रीडिंग ठरलेल्या तारखांनिहाय होत नाही. विजेच्या मीटरचे रीडिंग विलंबाने होते; मात्र याचा फटका वीज ग्राहकांना सहसा बसत नाही.

हे घ्या उदाहरण

एखाद्या वीज ग्राहकाच्या मीटर रीडिंगचे सायकल २६ जून ते २६ जुलै असे आहे. समजा या ग्राहकाच्या विजेच्या मीटरचे रीडिंग २७ जुलै रोजी झाले आणि २६ जून ते २६ जुलै या दरम्यान सदर ग्राहकाने ३०० युनिट विजेचा वापर केला असेल व विजेच्या मीटरचे रीडिंग २७ जुलै रोजी झाले तर एका दिवसाच्या विलंबामुळे विजेच्या युनिटच्या वापरात समजा वीसने वाढ झाली. म्हणजे विजेच्या एकूण युनिटचा वापर ३२० होतो. आता समजा स्लॅब बेनिफिट ३०० युनिटपर्यंत आहे. त्यामुळे ३०० युनिटपर्यंत जे दर आहेत त्या दराने त्याला तेवढे वीज बिल आकारले जाईल; मात्र त्या पुढील जे २० युनिट आहेत ते त्याचे बिल त्या ग्राहकाला वाढीव दराने आकारले जाईल.

आता याच प्रकरणात २६ जुलैला विजेच्या मीटरचे रीडिंग झाले असते तर हेच २० युनिट पुढील महिन्याच्या म्हणजे २७ जुलैनंतरच्या वीज मीटरच्या रीडिंगमध्ये आले असते. २७ जुलै ते २६ ऑगस्टमधले विजेच्या मीटरचे रीडिंग पकडले तर ते २० ने कमी म्हणजे २८० होणार. आता हेच २० युनिट जूनऐवजी जुलैमध्ये चार्ज झाले तर सदर ग्राहकाला ३०० युनिटपर्यंतचा विजेचा दर लागू झाला असता.

आता दोन्ही वेळेला सदर वीज ग्राहकाचा वापर हा ३०० युनिटच्या आतमध्ये असेल तर मात्र वीज ग्राहकाला वाढीव वीज बिलाचा फटका बसणार नाही. कारण अशावेळी स्लॅबमध्ये वाढ होत नाही. थोडक्यात युनिटमध्ये वाढ झाली तर पहिल्या स्लॅबची सवलत सदर वीज ग्राहकाला मिळणार नाही.

वीज कंपन्या काय म्हणतात...

महावितरण : विजेच्या मीटरचे रीडिंग एका दिवसाने विलंबाने झाले तर विजेच्या वापराच्या युनिटमध्ये जेमतेम वाढ होते आणि त्याचा वीज ग्राहकाला फार काही फटका बसत नाही.

टाटा पॉवर : आम्ही आमच्या वीज ग्राहकांचे मीटर रीडिंग तारखेनिहाय / सायकलप्रमाणे करतो. त्यामुळे अशा अडचणी येत नाहीत आणि समजा एखाद्या वीज ग्राहकाचे मीटर रीडिंग एका दिवसाच्या विलंबाने झाले तर मात्र पुढील बिलामध्ये तडजोड करत हा प्रश्न निकाली काढला जातो.

अदानी इलेक्ट्रिसिटी : याविषयी अदानी इलेक्ट्रिसिटीला प्रतिक्रिया विचारली असता, संबंधितांकडून प्रतिसाद मिळाला नाही.

घरगुती निवासी

विजेचे दर (रुपये प्रति युनिट)

ग्राहक गट/महावितरण/बेस्ट/अदानी/टाटा

० ते १०० युनिटस/६.०३/३.५४/४.८७/२.१६

१०१ ते ३००युनिटस /९.९४/६.४९/७.२९/५.२४

३०१ ते ५००युनिटस /१२.८४/८.९८/८.८७/८.७८

५०० पेक्षा अधिक युनिटस /१३.५४/१०.३९/१०.०१/९.८१

Web Title: Delay in meter readings shocks power consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.