नामदेव मोरे - नवी मुंबईजागतिक दर्जाचे शहर बनविण्याच्या अट्टाहासापायी नवी मुंबईमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास केला जात आहे. दगडखाणींमुळे डोंगरांचे अस्तित्व नष्ट होत आहे. खाडीमध्ये प्रदूषण प्रचंड वाढले आहे. ध्वनिप्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. इमारतींचे मजले वाढविण्याच्या स्पर्धेमध्ये पर्यावरण रक्षणाचा विसर पडला आहे. नवी मुंबईला निसर्गाचे वरदान लाभले आहे. दिघा ते बेलापूरपर्यंत डोंगररांगा पसरल्या आहेत. दुसऱ्या बाजूला दिवा ते दिवाळेपर्यंत ३४ किलोमीटरचा खाडीकिनारा लाभला आहे. शहरात २५ नैसर्गिक तलाव, १३२ विहिरी आहेत. निसर्गाचा मोठा ठेवा लाभला आहे. शहर विकासाच्या नावाखाली दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. नेरूळ ते दिघा दरम्यान दगडखाणींनी डोंगर पोखरले आहेत. डोंगरांचे अस्तित्वच नष्ट होवू लागले आहे. दगडखाणींमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरू लागले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. श्वसनाचे आजार वाढू लागले आहे. टी.बी. व इतर आजारही होवू लागले आहे. खाणमजूर व इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. बंद दगडखाणींच्या जागेवर अतिक्रमण होत आहे. खाण परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपण केले जात नाही. नवी मुंबईमधील खाडीही प्रदूषित झाली आहे. महापालिकेने मलनिस्सारण वाहिन्यांमधील दूषित पाणी खाडीत जावू नये यासाठी अत्याधुनिक मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रे उभारली आहेत. परंतु ठाणे व मुंबई महापालिकेच्या मलनिस्सारण वाहिन्यांमधील दूषित पाणी खाडीत सोडले जात आहे. याशिवाय कारखान्यांमधील पाणीही चोरून खाडीत सोडले जात आहे. यामुळे खाडीचे पाणी प्रचंड दूषित झाले आहे. त्याचा परिणाम मासेमारीवर होवू लागला आहे. अनेक ठिकाणी खारफुटी नष्ट केली जात आहे. नवी मुंबईकरांना सर्वाधिक त्रास ध्वनिप्रदूषणाचा होवू लागला आहे. शहरातील सर्वच विभागांमध्ये मर्यादेपेक्षा ध्वनीचे प्रमाण जास्त आहे. दाट लोकवस्ती, वाहनांची वाढती संख्या यामुळे हे प्रमाण वाढले आहे. वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होवू लागला आहे. चिडचिडेपणा वाढू लागला आहे. नवी मुंबईमध्ये १३२ विहिरी आहेत. सर्वच विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. शहरातील २५ तलाव असून पालिकेने गॅबीयन वॉल टाकून प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु बहुतांश तलावांमधील पाणी दूषित असून त्यामध्ये कचरा टाकला जात आहे. शहरात वृक्षारोपणही पुरेशा प्रमाणात होत नाही. नवी मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याच्या घोषणा येथील राज्यकर्ते करत आहेत. परंतु दुसरीकडे विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास सुरू केला आहे. याचा गंभीर परिणाम भविष्यात शहरवासीयांना भोगावा लागणार आहे. शहरातील प्रदूषणाची सद्य:स्थितीच्दगडखाणींमुळे डोंगर पोखरले जात आहेतच्एमआयडीसीत खाणींमुळे धुळीचे साम्राज्यच्एमआयडीसीत वृक्षारोपणाकडे दुर्लक्षच्मोकळ्या जागांवर व नाल्यांमध्ये डेब्रिजचा भरावच्गृहनिर्माण सोसायटीत वृक्षलागवड नाहीच्विहिरींमधील पाणी दूषित, पाण्याचा वापर नाहीच्तलावांमध्ये कचरा टाकल्यामुळे पाणी दूषितच्वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ध्वनिप्रदूषणामध्ये वाढच्शांतता क्षेत्रामध्येही प्रदूषणामध्ये वाढ च्ठाणे व मुंबईतील मलनिस्सारण वाहिन्यांतील पाण्यामुळे खाडी दूषितच्कारखान्यांमधील दूषित पाणी खाडीत च्खारफुटी नष्ट करण्याचे प्रमाण वाढतेय शहरात डेब्रिजचे अतिक्रमण वाढत आहे. खाडीकिनारी, एमआयडीसी व इतर मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकले जात आहे. डेब्रिजचे अतिक्रमण रोखण्यात महापालिकेस अपयश आले आहे. प्रशासनाचेही यास अभय मिळत असून वेळेत हे अतिक्रमण रोखले नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. अनेक दगडखाणी बंद झाल्या आहेत. खाणींमधील मोकळी जागा वाढत आहे. या जागांवर भरणी करून वृक्षारोपण करण्याची गरज आहे. अन्यथा सदर ठिकाणी अतिक्रमण होवून पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. बेलापूरमधील डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. परंतु सदर ठिकाणी मंदिर व झोपड्या वाढत असून पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला आहे.