Join us

अति उच्च रक्तदाबामुळे आयुर्मानात घट

By admin | Updated: May 17, 2015 00:32 IST

बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मात्र, हेच आजार सर्वसामान्यांचे आयुर्मान कमी करत आहेत.

पूजा दामले ल्ल मुंबईबदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मात्र, हेच आजार सर्वसामान्यांचे आयुर्मान कमी करत आहेत. २०१५मध्ये सामान्य माणसाचे आयुर्मान हे सरासरी ६७ वर्षे इतके आहे. पण, अति उच्चरक्तदाब (२०० - १३०, १२० एमएम एचजी) असलेल्या व्यक्तींचे आयुर्मान सरासरी ४८ ते ५५ वर्षे इतके असते. याचाच अर्थ सामान्य आयुर्मानापेक्षा १० ते १५ वर्षांपेक्षा कमी असल्याचे केईएम रुग्णालयाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले. अति उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना वेळेवर उपचार न मिळाल्यास त्यांच्या इतर अवयवांवर परिणाम होण्याचा धोका वाढतो. अनेक रुग्ण हे रुग्णालयात आणले जातात तेव्हा त्यांची प्रकृती अत्यवस्थ असते. काहींना हृदयविकाराचा झटका अलेला असतो, तर काहींना पक्षाघात झालेला असतो. या वेळी त्यांच्या तपासण्या केल्यावर त्यांना अति उच्च रक्तदाब असल्याचे आढळून येते. दरदिवशी २ ते ३ रुग्ण या अवस्थेत रुग्णालयात दाखल होत असल्याचे केईएम रुग्णालयाच्या हायपरटेन्शन युनिटचे प्रमुख डॉ. संतोष सलागरे यांनी स्पष्ट केले. डॉ. सलागरे यांनी सांगितले की, हायपरटेन्शन युनिट आणि रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचा अभ्यास आम्ही केला. यामध्ये असे आढळून आले, मूत्रपिंडाचा आजार, हृदयविकार, मेंदूच्या आजाराच्या उपचारासाठी आल्यावर ५० टक्के जणांना उच्चरक्तदाब असल्याचे समजते. यामधील ८० ते ८५ टक्के जणांच्या इतर अवयवांमध्ये बिघाड होण्याची शक्यता अधिक असते; तर यापैकी ५० टक्के जणांवर मृत्यू ओढवण्याची भीती असते. काही वर्षांपूर्वी उच्चरक्तदाब हा वयाच्या पन्नाशी अथवा साठीनंतर व्हायचा. पण आता तरुण पिढीमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्ती, कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थी, बेरोजगार तरुण, नवीन नोकरी करणारे तरुण यांनाही उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. कारण यांच्या खाण्याच्या वेळा ठरलेल्या नसतात. कमी झोप यामुळे हा त्रास बळावतो. पण तरुण वयात झालेला उच्च रक्तदाब हा नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. योग्य सकस आहार, रोजच्या रोज व्यायाम, योगा, प्राणायाम, वजन आटोक्यात ठेवणे ही पथ्ये पाळल्यास औषध न घेताही उच्च रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. तरुणांनी मद्यप्राशन, धूम्रपान अशा व्यसनांपासून लांब राहिले पाहिजे. उच्चरक्त दाबाचे निदान लवकर न झाल्यास, रक्तवाहिन्यांवर येणाऱ्या दबावामुळे मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि डोळ्यांवर परिणाम दिसून येतो. या चार अवयवांवर परिणाम झाल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. बराच काळ उपचार न घेतल्यास अति उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना अर्धांगवायू आणि हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचे डॉ. सलागरे यांनी सांगितले. खाण्यावर नियंत्रण ठेवल्यास उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे अथवा टाळता येणे सहज शक्य आहे. दररोजच्या अन्नात भाज्या, मसूर आणि सॅलेडचा समावेश असावा. बटर, तेलाचा जास्त वापर टाळा. मिठाचा जास्त वापर टाळावा. यापेक्षा वनौषधी, लसूण, लिंबाचा रस, मिरी, मिरची, आल्याचा वापर करावा. रोज योग्य प्रमाणात पाणी, ज्युस प्यावे. - डॉ. प्रतीक सोनी, हृदयरोगतज्ज्ञ, वोक्हार्ट रुग्णालय च्उच्च रक्तदाब हा हृदयवाहिन्यांसंबंधित विकार आहे. व्यक्तीमध्ये १४०/९० एमएम एचजीपेक्षा अधिक रक्तदाब वारंवार दर्शवत असल्यास त्या स्थितीस उच्च रक्तदाब असे म्हणतात. सामान्य व्यक्तींचा रक्तदाब हा १२०/८० एमएम एचजी इतका असतो. उच्च रक्तदाबात नक्की काय होते? उच्च रक्तदाबाची अवस्था अनेक काळ राहिल्यास धमणी काठिण्य ही व्याधी होते. यामुळे धमण्यांतील लवचीकता नष्ट होऊन धमण्या जाड, कठोर बनतात. यामुळे रक्तप्रवाहाच्या मार्गात अडथळे येतात. यामुळे हृदयविकाराचा झटका येणे, किडन्या निकामी होणे, स्ट्रोक असे आजार उद्भवू शकतात. च्उच्च रक्तदाब अथवा अति उच्च रक्तदाब झाल्यास अनेकदा कोणतेही लक्षण दिसून येत नाही. यामुळे याला सायलेंट किलर असेही म्हणतात. उच्च रक्तदाबाचे लवकर निदान न झाल्यास कालांतराने त्या व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होण्यास सुरुवात होतेअभिनव उपक्रम : जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या संकल्पनेनुसार, एक अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ११ वाजता उच्च रक्तदाब या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.