ग्राहकांची वाढती मागणी : एपीएमसीजवळील घाऊक बाजारपेठेतही ग्राहकांची गर्दी
पूनम गुरव, नवी मुंबईलाडक्या बाप्पाच्या स्वागताची नवी मुंबईमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. सर्व बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने गजबजल्या आहेत. यावर्षी गणपतीची आरास इकोफ्रेंडली करण्याकडे गणेश भक्तांचा कल अधिक असल्याने वेलीच्या सजावटीला अधिक मागणी आहे. सर्व बाजारपेठा रंगीबेरंगी फुले, पाने, फळांच्या वेली, गुच्छ, फुलदाणीने सजल्या आहेत. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये यावर्षी पारंपरिक सजावटीच्या साहित्याबरोबर विविध आकाराच्या वेली, पाने, फुले, फळे यांनी बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. गणपतीच्या सजावटीसाठी गणेशभक्त मोठ्या उत्साहाने सजावटीच्या साहित्यांची खरेदी करत आहेत. गणपतीच्या आरास सजावटीबरोबर विविध प्रकारची रंगीबेरंगी रोषणाई, त्यातील विविध प्रकारात ग्राहकवर्ग खरेदी करताना दिसत आहेत. बाजारपेठेत विविध प्रकारची कृत्रिम फुले आणि वेलीबरोबर रोषणाईच्या विविध रंगांच्या माळा व बल्ब विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. लाईटिंगच्या समयाही उपलब्ध आहेत. त्याचबरोबर देवघरात गणपती स्तोत्र, गायत्री मंत्र सुरू राहण्यासाठी विविध कॅसेट, सीडी उपलब्ध असून गणेशभक्तांची याला अधिक पसंती मिळत आहे. झगमग रोषणाई, सजावटीसाठी लाल, हिरवा, पिवळ्या रंगामध्ये लहान बल्ब किंवा मोठ्या आकारात आणि रंगामध्ये मिळत आहेत. त्याचबरोबर गणपतीच्या पुढे ठेवण्यासाठी लाल आणि पिवळ्या रंगाचे लहान बल्ब असलेल्या समया बाजारात उपलब्ध आहेत. एक फुटाच्या उंचीपासून पाच फूट उंचीच्या समया बाजारपेठेत उपलब्ध आहेत. वेली, फुले आणि रोषणाई वेगळी घेण्याऐवजी आर्टिफिशल वेली, फुले, पाने, फळे इत्यादीमध्ये एकत्रित बनविलेल्या लाईटिंगच्या माळांना गणेशभक्तांची अधिक पसंती मिळत आहे. हिरेजडित झुंबर आणि प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या माळांनाही पसंती मिळत आहे.