Join us  

गिरणी कामगारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 3:01 AM

मुंबई मंडळातर्फे २ डिसेंबर २०१६ रोजी गिरणी कामगारांसाठी सोडत जाहीर करण्यात आली होती.

मुंबई : म्हाडाच्यामुंबई मंडळातर्फे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अखत्यारित असलेल्या पनवेलमधील कोन येथील २ हजार ४१७ घरांची सोडत गिरणी कामगारांसाठी काढण्यात आली होती. या सोडतीमध्ये विजेत्या ठरलेल्यांपैकी ३४६ यशस्वी गिरणी कामगारांना प्रथम सूचनापत्रे पाठविण्यात आली आहेत. त्यानुसार त्यांनी कागदपत्रे सादर करायची आहेत. पण कागदपत्रे सादर करण्यासाठी म्हाडाने मुदतवाढ दिली आहे. आता ३१ आॅगस्टपर्यंत म्हाडाने अंतिम मुदतवाढ दिली असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे विजेत्या गिरणी कामगारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी एक महिन्याचा अवधी मिळाला आहे.

मुंबई मंडळातर्फे २ डिसेंबर २०१६ रोजी गिरणी कामगारांसाठी सोडत जाहीर करण्यात आली होती. २ हजार ४१७ सदनिकांकरिता काढलेल्या सोडतीतील ३४६ यशस्वी अर्जदारांनी अद्याप पात्रता निश्चितीसाठी कागदपत्रे सादर केलेली नाहीत. या अर्जदारांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अर्जदारांना पात्रता निश्चितीसाठी ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्यांनी महिंद्रा बँकेच्या हॉलमार्क प्लाझा, कलानगर वांद्रे (पू.) या शाखेत बँकेच्या कार्यालयीन दिवशी आणि वेळेत कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.तसेच ज्या गिरणी कामगारांनी विकल्प अर्ज -२ भरून दिले आहेत मात्र त्यांच्यापैकी ज्या गिरण्यांच्या जागेवर घरे उपलब्ध होणार नाहीत अशा अर्जदारांकडून विकल्प अर्ज-१ भरून देणे आवश्यक आहे. यामुळे त्यांनादेखील पुन्हा विकल्प अर्ज आणि आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याची संधी मंडळातर्फे यादरम्यान देण्यात आली आहे. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास संबंधिताचा अर्ज रद्द करून प्रतीक्षा यादीवरील गिरणी कामगारांना किंवा त्यांच्या वारसांना संधी देण्यात येईल, असे म्हाडाने या अर्जदारांना सूचित केले आहे.

टॅग्स :मुंबईम्हाडापनवेल