Join us  

पुढील पाच दिवस धोक्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:06 AM

अनेकांच्या घरात शिरले पाणीपाणी साचल्याने वाहतूक मंदावलीविजेचा लपंडावाने रहिवासी हैराणठाणे जिल्ह्यात पावसामुळे अनेक शहरांसह ग्रामीण भागात ...

अनेकांच्या घरात शिरले पाणी

पाणी साचल्याने वाहतूक मंदावली

विजेचा लपंडावाने रहिवासी हैराण

ठाणे जिल्ह्यात पावसामुळे अनेक शहरांसह ग्रामीण भागात मुख्य रस्त्यांसह चौकाचौकांमध्ये पाणी तुंबले. तसेच गटारे व नाल्यांची सफाई व्यवस्थित न झाल्याने दिवा, मुंब्रा, कल्याण पूर्व, भिवंडी शहरातील अनेक घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. भिवंडी-मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक मंदगतीने सुरू होती. ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह भिवंडी, मीरा-भाईंदर शहरांतही अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

नवी मुंबई

एपीएमसीत पाणी भरले

नाल्यात पडून मुलगा जखमी

वृक्ष कोसळले; संरक्षक भिंत पडली.

पनवेलसह नवी मुुंबईलाही बुधवारी पावसाने झोडपले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये पाणी साचले होते. तुर्भे इंदिरानगरमध्ये नाल्यात पडून एक मुलगा जखमी झाला. काही ठिकाणी वृक्ष कोसळण्याची तर एका ठिकाणी संरक्षक भिंत कोसळली. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

रायगडघर कोसळले

मुंबई-गाेवा महामार्गावर वाहतूक कोंडी

पेण : तालुक्यात एक बंद घर पावसामुळे काेसळले, तर मुंबई-गाेवा महामार्गावरील खराब रस्त्यांमुळे पाेलादपूर येथे वाहतूक काेंडीचा सामना प्रवाशांना करावा लागला.

अलिबागमध्ये एकजण बुडाला

कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूला मासेमारी करण्यासाठी गेलेला एक जण वाहून गेला आहे. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दिनेश हरी राक्षीकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पालघर

अनेक भागांत शिरले पाणी

शेतकरी मात्र सुखावले

पालघर जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला असून, अनेक भागांतील घरात पाणी शिरले तर पालघर-बोईसर रस्ता पाण्याखाली गेल्याने प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागले. या पावसाने शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असले तरी ग्रामीण भागातील शेतकरी सुखावल्याचे चित्र दिसून आले.

पहिल्याच डावात द्विशतक

मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईला झोडून काढले. ९ जून रोजी सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईत २२०.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शहरात १०२.२९, पूर्व उपनगरांत १६९.१७ आणि पश्चिम उपनगरांत १३७.३३ मि.मी. पावसाची नोंद झाली.

पुढील पाच दिवस धोक्याचे

बुधवारी मान्सून मुंबई, ठाणे, पालघर आणि नागपूरमध्ये दाखल झाल्याची घोषणा करतानाच पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीला धोकादायक असतील, असा इशाराही हवामान खात्याने दिला. पुढील पाच दिवस कोकण किनारी पावसाचा धिंगाणा सुरू राहणार असून, विशेषत: मुंबईला ऑरेंज अलर्ट दिल्याने येथील सर्वच यंत्रणांना सतर्क रहावे लागणार आहे.