Join us

दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर आपले स्वागत आहे...स्थानकात प्लॅटफॉर्मची नवी रचना, जुने १ ते ७ क्रमांक इतिहासजमा

By नितीन जगताप | Updated: December 10, 2023 06:17 IST

मध्य रेल्वेच्या प्रवाशांची दादर स्थानकावर अंमळ अधिकच गर्दी असते.

नितीन जगताप

मुंबई : भाजी असो, फुले असो, लग्नाचा बस्ता असो वा पुस्तक विकत घेणे असो... प्रत्येकाचे खरेदीचे हक्काचे ठिकाण म्हणजे दादर. त्यामुळेच मध्य आणि पश्चिम रेल्वेवरचे सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून दादरची ओळख आहे. त्यातही मध्य रेल्वेच्या प्रवाशांची दादर स्थानकावर अंमळ अधिकच गर्दी असते.

रोजच्याच नव्हे, तर नवशा-गवशांसाठीही दादर स्थानक अतिपरिचयाचे. या फलाटावरून त्या फलाटावर येथील प्रवासी बिनदिक्कत जातात. मात्र, आता थोडा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. शनिवारपासून दादर स्थानकाच्या मध्य रेल्वेवरील फलाटांची उद्घोषणा ८ ते १४ अशी होणार आहे.

दादर स्थानकातील फलाटांचे क्रमांक बदलण्याचा प्रकार रेल्वेच्या इतिहासात प्रथमच घडला आहे. पश्चिम रेल्वेवरील फलाट क्रमांक १ ते ७ आणि मध्य रेल्वेवरील फलाटांचे क्रमांक ८ ते १४ असे असतील.

शनिवारपासून हा बदल अंमलात आला. स्थानकावरील उद्घोषणांत हा बदल अंमलात आणण्यात आला. फलाट क्रमांक ८ ची गाडी कल्याणला जाणारी धिमी लोकल आहे, तर फलाट क्रमांक १२ वर आलेली गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल आहे, या उद्घोषणांनी प्रवासी गोंधळलेले दिसत होते. प्रवाशांचा गोंधळ टाळण्यासाठी फलाट आणि पादचारी पुलावर मध्य रेल्वेतर्फे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. प्रवाशांना सवय होईपर्यंत हे मदत कक्ष कार्यरत राहणार असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा गोंधळ होऊ नये म्हणून सलग फलाट केले आहेत हा चांगला निर्णय आहे. काही दिवस प्रवाशांचा गोंधळ होईल; परंतु लवकरच त्यांना सवय होईल.  रेल्वेच्या चांगल्या उपक्रमाला सहकार्य करणे आवश्यक आहे.

- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ.

रेल्वेने  केलेला बदल चांगला आहे. त्यामुळे अनेकदा काही प्रवासी मध्यऐवजी पश्चिम किंवा पश्चिमचे प्रवासी मध्य रेल्वेवर येत होते. त्यांना पुन्हा धावपळ करावी लागत होती.

              - शिरीष सुर्वे, प्रवासी

दादर रेल्वे स्थानकात मध्य रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊनची गाडी कुठे येते, जलद आणि धिम्या गाड्या कुठे येतात, हे नियमित प्रवाशांना माहिती आहे. फलाटाचा क्रमांक बदलला तरी त्याचा काही परिणाम होत नाही.

              - प्रशांत शिंदे, प्रवासी

लांब पल्ल्याच्या गाड्यांतील प्रवाशांचा गोंधळ होतो. सलग फलाटांमुळे नवीन प्रवाशांचा गोंधळ होणार नाही.

- अंकिता लांडगे, प्रवासी