Join us  

दादर, माहीम, धारावीसह पश्चिम उपनगर रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 1:07 AM

अंधेरी, जोगेश्वरीसह दहिसरमध्ये धाेका वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मध्य मुंबईसह पश्चिम उपनगरात कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. मुंबई महापालिकेतील आकडेवारीनुसार मध्य मुंबईमध्ये माहीम, दादर आणि धारावीत पुन्हा मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. याव्यतिरिक्त पश्चिम उपनगरात अंधेरी, दहिसर आणि लगतच्या परिसरात रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत असून, येथील जागरूक नागरिकांच्या मते लोकांकडून नियम धाब्यावर बसविले जात असल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने संयुक्तरीत्या केलेल्या प्रयत्नांमुळे मुंबईत कोरोना आटोक्यात आला होता. गणेशाेत्सव, नवरात्राेत्सव, दिवाळी, अशा सणांवर बंधने घालून गर्दी कमी करून कोरोना नियंत्रणात आणण्यात मुंबई महापालिकेला यश आले होते. धारावी आणि पश्चिम उपनगरात पालिकेने मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली होती. कोरोना रुग्ण कमी करण्यात यश मिळाले होते. मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणावर काम सुरू केले होते. वॉर रूम, कॉल सेंटर आणि इतर कामांमुळे पश्चिम उपनगरात कोरोना नियंत्रणात आला होता.

मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगर झोपडपट्टी असलेल्या परिसरात रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याचे समोर येत आहे. या परिसरात कुर्ला, चेंबूर येथील झोपडपट्टी परिसर माहीम, धारावी, दादर येथील परिसर आणि पश्चिम उपनगरातील दहिसर, जोगेश्वरी, अंधेरीसारखे परिसर यांचा समावेश आहे. लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यापासून रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याचे म्हणणे मांडले जात असले तरी पुढील काही दिवसांत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले. त्यामुळे काही दिवसांत परिस्थिती बदलते, की तशीच राहते हे नागरिकांवर अवलंबून असणार असून, कोरोनाचे समूळ उच्चाटन करायचे असेल, तर नियम काटेकाेरपणे पाळा, असे आवाहन मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा केले आहे.

गरज असेल तरच घराबाहेर पडा - महापालिका मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरांत दहिसर परिसरात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शक्यतो गरज असेल, तरच घराबाहेर पडा. सगळे नियम पाळा. आपल्या आरोग्याची, आपल्या कुटुंबीयांची अधिकाधिक काळजी घेण्यासाठी जबाबदारीने वागा, असे आवाहन सातत्याने मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे.

जोगेश्वरीत रोज पहारापश्चिम उपनगरांमध्ये रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने येथे आता अधिकाधिक खबरदारी घेतली जात आहे. गेल्या आठवड्यात जोगेश्वरीत दिवसाला सुमारे ३०० रुग्ण आढळून येत होते. मागच्या आठवड्यातील हा आकडा असला तरी या आठवड्यात हे प्रमाण कमी झाल्याचा दावा केला जात आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी जागोजागी पोलिसांकडून पहारा दिला जात आहे.