Join us  

फुलाच्या वाघ, अस्वलासोबत सेल्फीसाठी राणीबागेत गर्दी; ३ दिवसांत दीड लाख नागरिकांची हजेरी

By सीमा महांगडे | Published: February 04, 2024 10:59 PM

दरवर्षीच्या वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनामध्ये पाना-फुलांचा वापर करून वैविध्यपूर्ण रचना सादर करण्यात येतात.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: आपल्या आवडत्या कार्टून कॅरॅक्टर्सच्या फुलांपासून बनवलेल्या प्रतिकृतीसोबत सेल्फीसाठी उडालेली झुंबड, विविध रंगांच्या फुलांना फोटोत टिपण्यासाठी घाई आणि रोपांची माहिती मिळवण्यासाठीची लगबग… अशा वातावरणात पालिकेकडून ३ दिवसांच्या प्रदर्शनात तब्बल दीड लाख नागरिक व बीचचे कंपनीने हजेरी लावली. विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींसह पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या पुष्पोत्सवाला भेट दिली.दरवर्षीच्या वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनामध्ये पाना-फुलांचा वापर करून वैविध्यपूर्ण रचना सादर करण्यात येतात. या रचनांना देखील मुंबईकर नागरिकांचा आणि विशेष करून लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. २०१५ पासून या प्रदर्शनाला विविध सृजनशिल कल्पनांची जोड देण्यात आली आहे. त्यानुसार दरवर्षी एक वेगळा विषय घेवून हे प्रदर्शन मांडण्यात येते. यंदा राणीबागेत ३ दिवसांतील पुष्पोत्सवासाठी ‘ॲनिमल किंग्डम’ ही संकल्पना घेवून उद्यान विभागाने हत्ती, वाघ, झेब्रा, अस्वल आदी प्राण्यांच्या पुष्पप्रतिकृती साकारल्या. फळांच्या विविध प्रजातींची रोपटे, रंगबेरंगी फुलझाडे, वनस्पती औषधी आदींचा समावेश होता. यासाठी तब्बल दहा हजार कुंड्यांचा वापर करण्यात आला. पाना-फुलांपासून साकारलेले उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ साकारण्यात आलेले 'चांद्रयान' विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.दिग्गजांची भेटया प्रदर्शनाला जपान, मलेशिया, कॅनडा, मॉरिशस या देशांच्या राजदूतांसोबतच अतिरिक्त मुख्य न्यायाधीश मंजुषा देशपांडे, अभिनेता रणजित, पवन मल्होत्रा, एकता जैना, ज्येष्ठ क्रिकेटपटू  दिलीप वेंगसेकर आदी दिग्गजांनीही भेट दिली. प्रदर्शनासोबतच उद्यानविषयक वस्तुंची विक्री, फुले-फळे झाडांसाठी लागणारे खत आदींची दालने याठिकाणीही नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींनी मोठी गर्दी केली. 

टॅग्स :राणी बगीचा