Join us  

सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

By admin | Published: September 02, 2015 3:07 AM

अंगारकी चतुर्थीनिमित्ताने शहर-उपनगरात गणेशभक्तांची पावले सिद्धिविनायक मंदिराकडे वळली होती. सोमवारी मध्यरात्रीपासून दीड वाजल्यापासूनच बाप्पाचे दर्शन

मुंबई : अंगारकी चतुर्थीनिमित्ताने शहर-उपनगरात गणेशभक्तांची पावले सिद्धिविनायक मंदिराकडे वळली होती. सोमवारी मध्यरात्रीपासून दीड वाजल्यापासूनच बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांग लावली होती. यंदाच्या वर्षीची ही एकच अंगारकी असल्याने मंदिरात विशेष गर्दी दिसून आली. रात्री उशिरापर्यंत भाविकांचे जत्थे सिद्धिविनायक मंदिरात येत होते. अंगारकी चतुर्थीनिमित्ताने ही गर्दी अपेक्षित असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराच्या परिसरात अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, भक्तांच्या सोयीसाठी न्यासातर्फे चोख व्यवस्था करण्यात आली होती. रवींद्र नाट्य मंदिरासमोरील नर्दुल्ला टँक मैदान येथे भाविकांच्या रांगेसाठी ४० हजार चौरस फुटांचा मंडप उभारण्यात आला होता. केवळ मुखदर्शनासाठी भाविकांची वेगळी सोय करण्यात आली होती, तर अपंग, गर्भवती महिला, नवजात बालक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी स्वतंत्र दर्शनाची सोय करण्यात आली होती. शिवाय मोफत पाणीवाटप, महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली होती. ही अंगारकी संकष्ट चतुर्थी श्रावणातील मंगळवारी असल्याने या चतुर्थीला विशेष महत्त्व होते.शिवसेनेतर्फे मंदिराच्या बाहेर भाविकांसाठी मोफत चहावाटपाची सोय करण्यात आली होती, शिवसेना-मनसेतर्फे भाविकांना दादर स्थानक ते सिद्धिविनायक मंदिर दरम्यान मोफत व्हॅनची सुविधा देण्यात आली. (प्रतिनिधी)