एनसीबीच्या पथकावर गोरेगावात जमावाचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 06:54 AM2020-11-24T06:54:32+5:302020-11-24T06:55:06+5:30

विभागीय संचालकासह दोघे किरकाेळ जखमी

Crowd attack on NCB squad in Goregaon | एनसीबीच्या पथकावर गोरेगावात जमावाचा हल्ला

एनसीबीच्या पथकावर गोरेगावात जमावाचा हल्ला

Next

मुंबई :   कॉमेडियन भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंम्बाचिया यांच्यावरील कारवाईमुळे पुन्हा चर्चेत आलेल्या अमली पदार्थ नियंत्रक कक्षाच्या (एनसीबी) पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथे घडली. तस्करावरील कारवाईला विरोध करीत त्यांनी तपास पथकाच्या गाडीला घेराव घालत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यामध्ये एनसीबीच्या मुंबई पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह दोघांना किरकोळ दुखापत झाली. तर गाडीचे नुकसान झाले. गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत जमावाला पांगवले. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

विपुल कृष्णा आंग्रे (वय २५), युसूफ अमीन शेख (२४) व त्याचे वडील अमीन अब्दुल शेख (५०, सर्व रा. गोरेगाव) अशी अटक आराेपींची नावे असून अन्य हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. त्यांच्यावर सरकारी कामकाजात अडथळा आणणे, जमाव जमवून हल्ला केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील अधीक्षक व्ही.व्ही. सिंह, निरीक्षक विश्वनाथ तिवारी, एस.एस. रेड्डी व चालक गोरेगाव येथे रविवारी रात्री कारवाईसाठी गेले हाेते. त्यांनी तस्कर कैरी मेंडिस याच्या घरातून २० एलसीडी पेपर जप्त केले. त्याला पकडून गाडीतून घेऊन जात असताना परिसरातील नागरिकांनी त्याला अटकाव केला. जवळपास ५० जण जमा होत पथकाला शिवीगाळ करीत त्याला सोडविण्याचा प्रयत्न करू लागले. धक्काबुक्की करून त्यांच्या गाडीवर हल्ला करू लागले. याबाबत एका अधिकाऱ्याने पोलीस नियंत्रणाला कळविले. त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत हल्लेखोरांना पांगवले. याबाबत एनसीबीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांची शोधमोहीम सुरू केली.

Web Title: Crowd attack on NCB squad in Goregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.