डिप्पी वांकाणी - मुंबई गुन्हेगारीवर आधारित मालिकांची (क्राईम सीरियल्स) विविध दूरचित्र वाहिन्यांना स्वत:चा ‘टीआरपी’ आणि पर्यायाने जाहिरातींचे उत्पन्न वाढविण्यास भक्कम मदत होत असली तरी अशा मालिकांमधून नवनवी तंत्रे शिकून गुन्हेगारी केली जात असल्याने अशा मालिका पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत. अलीकडच्या काळात पकडलेल्या अनेक गुन्हेगारांनी संबंधित गुन्ह्याची ‘आयडिया’ व तो करण्याची युक्ती आपण क्राईम सिरियल्स पाहून आत्मसात केल्याची कबुली दिली असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.सध्या विविध दूरचित्र वाहिन्यांवर एक डझनाच्या आसपास लोकप्रिय क्राईम सीरियल्स सुरु असून त्यांत नानाविध प्रकारच्या गुन्ह्यांचे अगदी बारीकसारिक तपशिलांसह चित्रिकरण केलेले असते. या सादरीकरणात मनोरंजन मूल्य खूप असल्याने अशा मालिका अबालवृद्धांमध्ये चांगल्याच लोकप्रिय आहेत. पण या मालिका बहुसंख्यांसाठी मनोरंजन व शिक्षणाचे साधन असल्या तरी काही ‘सुपिक’ डोक्यांना त्या गुन्हेगारीसाठी स्फूर्तीदायकही ठरत असल्याचे दिसत आहे.गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी आम्ही घरफोड्या करणाऱ्या एका चोराला अटक केली. नंतर घेतलेल्या जबानीमध्ये त्याने पोलिसांना सुगावा लागू नये यासाठी केलेली युक्ती उघड केली. पोलीस ‘कॉल डेटा’वरून गुन्हेगाराचा माग काढतात व शेवटी त्याला पकडतात,असे त्याने एका क्राईम सीरियलमध्ये पाहिले होते. अशा वेळी पोलिसांना गुंगारा देण्याची युक्तीही तो अशाच मालिकांमधून शिकला होता. तेच तंत्र आत्मसात करून यानेही अनेक सिम कार्ड्स घेतली होती व प्रत्येक व्यक्तीशी मोबाईलवरून बोलताना तो वेगळे सिम कार्ड वापरून बोलत असे.ई-मेल पाठवून लोकांना गंडा घालणारी नायजेरियन गुन्हेगारांची टोळी पकडली तेव्हा त्यांनीही क्राईम सीरियलमधील सूत्र पकडून आपण व्हॉट््स अॅपवर मेसेजेस टाकून संभाव्य ‘सावजां’ना कसे ग्रुपमध्ये ओढले याची माहिती दिली, असे आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांच्या मते क्राईम सीरियल्समध्ये गुन्ह्याचे आणि ते करण्याच्या पद्धतींचा तपशीलवार उलगडा केला जातो व नेमकी हीच गोष्ट अनाहूतपणे गुन्हेगारीचे शिक्षण देणारी ठरते. त्यामुळे असे कार्यक्रम सामान्य प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे साधन असते. पण गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मात्र त्यांच्याकडे शिक्षणाचे साधन म्हणून पाहतात.कोण त्या कशा दृष्टीने पाहतो यावर त्यांचे परिणाम वा दुष्परिणाम अवलंबून आहेत. जे कायदाभीरू आहेत त्यांना अशा कार्यक्रमांमधून आपण गुन्हेगारांच्या जाळ््यात कसे अडकू नये याचे शिक्षण मिळते. या उलट ज्यांची वृत्ती गुन्हेगारीची आहे अशांना या सीरियल्स गुन्हे करण्यासाठी स्फूर्ती ठरू शकतात. त्यामुळे वाहिन्यांना दोष देण्यात अर्थ नाही.
क्राइम सीरियल्स ठरताहेत पोलिसांसाठी डोकेदुखी !
By admin | Updated: February 15, 2015 01:11 IST