‘अनुमानवर आधारित आरोपांवरून गुन्हा नोंदविता येत नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 06:54 AM2020-10-29T06:54:49+5:302020-10-29T06:55:49+5:30

Sushant Singh Rajput Case : सुशांतप्रकरणी प्रियांका सिंग आणि मीतू सिंग यांच्याविरुद्ध  रिया चक्रवर्तीने पोलिसांत तक्रार नोंदविली. गुन्हा रद्द करण्यासाठी दोघींनी याचिका दाखल केली आहे.

'Crimes cannot be reported on the basis of conjecture' | ‘अनुमानवर आधारित आरोपांवरून गुन्हा नोंदविता येत नाही’

‘अनुमानवर आधारित आरोपांवरून गुन्हा नोंदविता येत नाही’

Next

मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या दोन्ही बहिणींवर बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन मिळवल्याचा केलेला आरोप अनुमानित आहेत, असे बुधवारी सीबीआयने उच्च न्यायालयाला सांगितले. अनुमानवर आधारित आरोपांवरून गुन्हा नोंदविला जाऊ शकत नाही, असे सीबीआयने स्पष्ट केले. सुशांतप्रकरणी प्रियांका सिंग आणि मीतू सिंग यांच्याविरुद्ध  रिया चक्रवर्तीने पोलिसांत तक्रार नोंदविली. गुन्हा रद्द करण्यासाठी दोघींनी याचिका दाखल केली आहे.

सुशांतला औषधे देण्यासाठी बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनच्या आधारे एनडीपीएस कायद्यांतर्गत बंदी असलेली औषधे मिळवली, असा आरोप रियाने सुशांतच्या बहिणींवर केला आहे. अनुमान व गृहीत धरून सुशांतच्या दोन्ही बहिणींवर आरोप केले, असे सीबीआयने सांगितले.
सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केलेल्या तक्रारीचा आम्ही तपास करत आहोत. रिया व तिच्या कुटुंबाने सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप के. के. सिंह यांनी केल्याचे सीबीआयने सांगितले.

‘...तर रिया गप्प का बसली?’
सुशांतच्या दोन्ही बहिणींवर गुन्हा नोंदविण्यापूर्वी स्थानिक पोलिसांनी प्राथमिक तपास करायला हवा होता. एकाच कारणासाठी दोन वेळा गुन्हा नोंदवू शकत नाही, अशी कायद्यातच तरतूद आहे. सुशांतच्या मृत्यूचे कारण सीबीआय तपासत आहे. जर सुशांत आणि त्याची बहीण प्रियांका यांच्यात जून २०२० मध्ये औषधांच्या प्रिस्क्रिप्शनसंदर्भात झालेल्या चॅटची माहिती रियाला होती, तर ती सप्टेंबरपर्यंत गप्प का बसली?  मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यापूर्वी रियाला सीबीआयकडे तक्रार करण्यास सांगायला हवे होते, असेही सीबीआयने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ४ नोव्हेंबर रोजी ठेवली. 

Web Title: 'Crimes cannot be reported on the basis of conjecture'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.