Join us  

दिल्लीच्या एसीपीवर अजामीनपात्र वॉरंट, साक्षीदार म्हणून हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 1:29 AM

सन २००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा खटला सुरू असलेल्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी दिल्लीच्या विशेष कक्षाचे पोलीस अधीक्षक (एसपी) मनिषी चंद्रा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

मुंबई : सन २००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा खटला सुरू असलेल्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी दिल्लीच्या विशेष कक्षाचे पोलीस अधीक्षक (एसपी) मनिषी चंद्रा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. साक्षीदार म्हणून त्यांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश असतानाही त्यांनी हजर राहणे टाळले. त्यामुळे न्यायालयाने चंद्रा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले.आरोपी अबू जुंदाल याला मनिषी चंद्रा यांनी अटक करून त्याच्याकडील पाकिस्तानी पासपोर्टसह अन्य साहित्य जप्त केले होते. सर्व मूळ कागदपत्रे सादर करण्यासाठी विशेष न्यायालयाने चंद्रा यांना न्यायालयात साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले.दिल्लीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने (पटियाला हाऊस) या दहशतवादी हल्ल्याचा तपास करणाºया अधिकाºयांना अबू जुंदालची पाच महत्त्वाची कागदपत्रे देण्यास नकार दिला. जुंदालची ओळख पटविण्यासाठी ही कागदपत्रे महत्त्वाची असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विशेष न्यायालयाला सांगितले. त्यानुसार विशेष न्यायालयाने चंद्रा यांना जुंदालच्या अटक करताना ताब्यात घेतलेली कागदपत्रे घेऊन हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र, चंद्रा न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. उलट त्यांनी आपण अन्य एका तपासात व्यस्त असून, न्यायालयात उपस्थित राहू शकत नाही, असे न्यायालयाला कळवले. न्यायालयाने पटियाला हाउस न्यायालयाच्या निबंधकांनाही उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. मात्र तेही उपस्थित राहिले नाहीत.‘साक्षीदार न्यायालयात हजर राहण्यास टाळत आहेत. उपस्थित न राहण्याचे त्यांच्याकडे कोणतेही योग्य कारण नाही. चंद्रा यांनी न्यायालयाला (पटियाला) आपण उपस्थित राहणार नाही असे सांगितले. तसेच भविष्यातही उपस्थित राहणार नसल्याचे कळवले. त्यामुळे निबंधकही न्यायालयात उपस्थित राहून कागदपत्रे सादर करू शकले नाहीत, असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने चंद्रा यांचा अजामीनपात्र वॉरंट काढला.रियासत अली खुशी मोहम्मद या व्यक्तीचा पासपोर्ट चंद्रा यांना न्यायालयात सादर करायचा होता. या पासपोर्टवर जुंदालचा फोटो लावलेला आहे. पाकिस्तानी नागरिक असल्याचे एक ओळखपत्र दाखवत जुंदाल याने रियासत अली नावाने पासपोर्ट मिळवला.

टॅग्स :न्यायालय