Join us  

‘गो-कार्टिंग’ला संरक्षण देण्यास न्यायालयाचा नकार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 5:53 AM

गेल्या आठवड्यात कमला मिल कंपाउंडमधील पबला भीषण आग लागल्यानंतर मुंबई महापालिकेने अनधिकृत रेस्टॉरंट व पब्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली.

मुंबई - गेल्या आठवड्यात कमला मिल कंपाउंडमधील पबला भीषण आग लागल्यानंतर मुंबई महापालिकेने अनधिकृत रेस्टॉरंट व पब्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये स्माश एंटरटेनमेंट प्रा.लि.च्या गो-कार्टिंग ट्रॅक, बार व रेस्टॉरंटवरही महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. त्याविरुद्ध कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु न्यायालयानेही कंपनीला महापालिकेच्या कारवाईपासून संरक्षण देण्यास सोमवारी नकार दिला.कमला मिल कंपाउंडमधील ‘वन अबव्ह पब’ व ‘मोजोस बिस्ट्रो’ या पब्सना आग लागल्यानंतर महापालिकेने या भागातील अनधिकृत बार व रेस्टॉरंट, पब्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाईपासून संरक्षण मिळावे, यासाठी स्माश एंटरटेनमेंट प्रा.लि.च्या ‘स्माश गो-कार्टिंग’, रेस्टॉरंट व बार ‘वेर्बेना’ आणि बँक्वेट ‘१८.९९ लॅटिट्यूड’वरही कारवाईचा बडगा उगारला. ही सर्व बांधकामे ‘ट्रेड व्ह्यू’च्या चौथ्या मजल्यावर आहेत.‘ट्रेड व्ह्यू’च्या चौथ्या मजल्यावर तात्पुरती शेड उभारण्यास संबंधित कायद्याच्या कलम ३४२ अंतर्गत परवानगी देण्यात आली होती, हे सिद्ध करण्यास याचिकाकर्ते अपयशी ठरले आहेत, असे म्हणत सुटीकालीन न्यायालयाने महापालिकेला या बांधकामाची पाहणी करण्याचे निर्देश दिले. ‘याचिकाकर्त्यांनी मंजूर आराखड्यापेक्षा अधिक जागेवर बांधकाम केले असल्यास महापालिका त्यावर कारवाई करू शकते,’ असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :न्यायालयमुंबई