मालवाहतुकीत देश परावलंबी राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 05:27 AM2020-02-13T05:27:39+5:302020-02-13T05:27:47+5:30

भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी वाढवण बंदर उभारणी क्रमप्राप्त

The country will remain dependent on freight | मालवाहतुकीत देश परावलंबी राहील

मालवाहतुकीत देश परावलंबी राहील

Next

संदीप शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुढील पाच वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत विस्तारण्याचे, तसेच देशाला जागतिक महासत्ता करण्याचे स्वप्न रंगविले जात असले तरी जगभरातून मालवाहतूक करणाऱ्या महाकाय जहाजांना थांबण्यासाठी देशात पुरेशा क्षमतेचे बंदरच नाही. कोलंबो, सिंगापूरच्या बंदरांवर अवलंबून राहावे लागते. भारतातली ९० टक्के आयात-निर्यात जलमार्गाने होत असताना स्वयंपूर्ण बंदर नसणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेला मारक आहे. त्यामुळेच गेल्या २५ वर्षांपासून चर्चेत असलेल्या डहाणूच्या वाढवण बंदर उभारणीसाठी केंद्राने नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.


देशात सध्या मुंबई, जेएनपीटी, कांडला, मार्मागोवा, नवीन मंगरूळ आदी १२ प्रमुख आणि १२५ लहान बंदरे आहेत. परंतु यापैकी एकाही बंदरात पाण्याची नैसर्गिक खोली १२ मीटर्सपेक्षा जास्त नसल्याने कंटेनर्सची वाहतूक करणारी मोठी जहाजे येथे दाखल होऊ शकत नाहीत. या जहाजांना सिंगापूर, कोलंबोच्या बंदरांमध्ये नांगर टाकावा लागतो. त्यानंतर तुलनेने छोट्या जहाजांमधून माल भारतातल्या बंदरांत दाखल होतो. वाढवण येथे २० मीटर नैसर्गिक खोली असून तेथे बंदर तयार झाल्यास ही जहाजे थेट दाखल होऊ शकतील.


देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील बंदरांची मालवाहतूक हाताळण्याची क्षमता १८ दशलक्ष टीईयू (२० फूट समकक्ष युनिट- जहाजाची मालवहन क्षमता) आहे. त्यापैकी जेएनपीटीची क्षमता ५.१ दशलक्ष टीईयू असून चौथ्या टर्मिनलच्या विस्तारीकरणानंतर ती १० दशलक्ष टीईयूपर्यंत जाईल. २०३० सालापर्यंत या किनारपट्टीवर २५ दशलक्ष टीईयू मालवाहतूक होईल अशी अपेक्षा आहे. १४० वर्षे जुन्या मुंबई आणि क्षमता संपलेल्या जेएनपीटीसह अन्य बंदरांना हा भार पेलणे अशक्य आहे. नवे बंदर उभे राहिले नाही तर देशातील मालवाहतूक व्यवस्थेपुढे अभूतपूर्व आव्हान उभे ठाकेल, अशी भीती व्यक्त होते आहे.
वापी, इंदौरच्या मुख्य औद्योगिक वसाहती, तसेच महाराष्ट्र, कर्नाटकाचा उत्तरेकडील भाग, मध्य प्रदेश, गुजरात या भागांतील मालवाहतुकीसाठी वाढवण बंदर अत्यंत उपयुक्त ठरेल. या प्रस्तावित बंदरापासून जेएनपीटी (१९० किमी), सुरत (१८० किमी), नाशिक (१६० किमी), दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉर (१२ किमी), दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्ग (३४ किमी), मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे (२२ किमी) आहे.


बंदर एक फायदे अनेक

सिंगापूर, कोलंबो बंदराद्वारे मालवाहतूक करावी लागत असल्याने खर्चात साधारणत: १० टक्के वाढ होते. पुढील १० वर्षांत मालवाहतुकीचा भार दीडपटीने वाढणार असल्याने हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे नवे बंदर क्रमप्राप्त आहे. नव्या बंदरामुळे लॉजिस्टिकवरील खर्च कमी होईल आणि वस्तूंच्या किमतीही थोड्याफार कमी होऊ शकतील. त्याशिवाय जेएनपीटी
आणि मुंबई बंदरातून देशाच्या उत्तरेकडील भागात मालवाहतूक करणारी अवजड वाहने सध्या ठाणे, मुंबई, नवी मुंबई या शहरांमधून ये-जा करतात. त्यामुळे या शहरांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होते. प्रदूषणाची पातळीही वाढते. वाढवण बंदरामुळे ते दुष्टचक्र संपेल अशी आशा आहे.

Web Title: The country will remain dependent on freight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.