Join us  

शिवडी-वरळी उन्नत मार्गाच्या खर्चाचा अंदाज चुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 3:37 AM

निविदेतील अंदाज खर्चापेक्षा ही रक्कम १९.७१ टक्क्यांनी जास्त आहे, तर आठ वर्षांपूर्वीच्या मूळ अंदाजापेक्षा हा खर्च दुप्पट आहे.

मुंबई : आठ वर्षांपूर्वी प्रस्तावित केलेल्या शिवडी-वरळी उन्नत मार्गासाठी ४९० कोटी रुपये खर्च होतील, असा अंदाज होता. सहा महिन्यांपूर्वी सुधारित अंदाजपत्रक तयार करताना तो खर्च ८८७ कोटींपर्यंत वाढला. त्यानुसार निविदा काढण्यात आल्या. मात्र, चार दिवसांपूर्वी कंत्राटदाराची नियुक्ती करताना या कामासाठी १०५१ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. निविदेतील अंदाज खर्चापेक्षा ही रक्कम १९.७१ टक्क्यांनी जास्त आहे, तर आठ वर्षांपूर्वीच्या मूळ अंदाजापेक्षा हा खर्च दुप्पट आहे.साडेचार कि.मी. लांब आणि १७.२० मीटर रुंद असा हा शिवडी-वरळी उन्नत मार्ग असेल. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एमएमआरडीएने २०१२ साली सर्वप्रथम सल्लागाराची नियुक्ती केली होती. त्या प्रकल्प अहवालानुसार बांधकामाचा खर्च ४९० कोटी, तर एकूण अंदाजित किंमत ५१७ कोटी होती. मात्र, त्या वेळी विविध कारणांमुळे हे काम एमएमआरडीएला सुरू करता आले नव्हते.फेब्रुवारी, २०१९ मध्ये सुधारित अहवाल सादर झाला. त्यानुसार प्रकल्पाच्या बांधकामाची किंमत ८७८ कोटी आणि एकूण अंदाजित किंमत १२७६ कोटींवर पोहोचल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार मार्च, २०१९ मध्ये काढलेल्या निविदांना पुरेसा प्रतिसाद मिळाला नव्हता. आॅगस्ट, २०१९ मध्ये पुन्हा निविदा प्रसिद्ध झाल्या. त्यात मे. अ‍ॅफकॉन्स इन्फ्रा (१२५० कोटी), जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर (१०५७ कोटी), लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो (१०७२ कोटी) आणि एनसीसी (११७९ कोटी) या चार निविदाकारांनी बोली लावली. जे. कुमार कंपनीची बोली लघुत्तम असली तरी ती मूळ अंदाज खर्चापेक्षा (८७८) २०.३१ टक्क्यांनी जास्त होती. या वाढीव दरांबाबत जे. कुमार कंपनीने दिलेली कारणमीमांसा, सल्लागारांचे विश्लेषण, निविदा समितीचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर या कंपनीलाच काम देण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. तत्पूर्वी जे. कुमार कंपनीसोबतच्या वाटाघाटीनंतर ५ कोटी १३ लाख रुपये कमी करून १०५१ कोटींमध्ये काम करण्याची तयारी त्यांनी दाखविल्याची माहिती एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी दिली.पुनर्वसनानंतरच कामाला मुहूर्त- शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पावरून येणाºया वाहतुकीसाठी हा उन्नत मार्ग अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळे ट्रान्स हार्बर लिंक सुरू होण्यापूर्वी हा मार्ग पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे प्रयत्न आहेत.मात्र, हे बांधकाम सुरू करण्यापूर्वी बाधितांच्या पुनर्वसनाची कार्यवाही एमएमआरडीएला करावी लागेल. त्यामुळे जे. कुमार या कंपनीला हे काम देण्याचा निर्णय झाला असला तरी पुनर्वसनाची कार्यवाही पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना कार्यादेश देता येणार नाहीत, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. या पुनर्वसनासाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :मुंबई