Join us  

महापालिका -‘आहार’मध्ये जुंपली

By admin | Published: September 02, 2015 3:00 AM

दादरच्या कबुतरखान्याजवळील ६० वर्षे जुुन्या लक्ष्मी हॉटेलचा पाणीपुरवठा पालिकेने शुक्रवारी खंडित केला. पालिकेने केलेली कारवाई अनधिकृत असल्याचा आरोप करत

मुंबई : दादरच्या कबुतरखान्याजवळील ६० वर्षे जुुन्या लक्ष्मी हॉटेलचा पाणीपुरवठा पालिकेने शुक्रवारी खंडित केला. पालिकेने केलेली कारवाई अनधिकृत असल्याचा आरोप करत ‘आहार’ या हॉटेल चालकांच्या संघटनेने विभागातील ११० हॉटेलचे परवाने पालिकेला परत देण्याचा प्रयत्न केला.यासंदर्भात सायंकाळी संघटनेने अतिरिक्त पालिका आयुक्त आनंद वागराळकर यांची भेट घेतली. त्यात सकारात्मक चर्चा झाल्याने तूर्तास तरी परवाने परत करण्याचा निर्णय मागे घेतल्याची माहिती आहार संघटनेचे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी दिली. तर अग्निशमन विभागाच्या काही अटींची पूर्तता झालेली नसल्याने पाणीपुरवठा खंडित केल्याचे वागराळकर यांनी सांगितले. शिवाय जोपर्यंत अटींची पूर्तता होत नाही, तोपर्यंत हॉटेलला परवाना देता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.यासंदर्भात स्थानिक राजकीय नेते आणि विकासक यांच्या दबावामुळे पालिका एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप हॉटेल मालक चंद्रकांत शेट्टी यांनी केला. शेट्टी म्हणाले की, गेल्या ६० वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करत असतानाही कोणतीही सूचना न देता पालिकेने कारवाई केली. अग्निशमन विभागाच्या कोणत्या अटींचा भंग केला आहे, याचीच माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे बुधवारी उल्लंघन झालेल्या नियमांची माहिती देण्याचे आश्वासन वागराळकर यांनी दिले आहे. ते तत्काळ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतरही पालिकेने परवाना दिला नाही, तर उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. या मुद्द्यावरून महापालिका आणि हॉटेल चालकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. (प्रतिनिधी)