Coronavirus : हातावर शिक्का मारल्यानंतर पुढे काय? प्रवाशांमध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 07:22 AM2020-03-19T07:22:18+5:302020-03-19T07:22:38+5:30

विमानतळावरून संबंधितांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कुणाची, याबाबत अनिश्चितता असल्याने, संबंधित प्रवासी स्वत:च्या जबाबदारीवर घरी निघाल्यास सहप्रवासी घाबरून आक्षेप घेतात. ​​​​​​​

Coronavirus: What's next with a seal on your hand? Confusion among travelers | Coronavirus : हातावर शिक्का मारल्यानंतर पुढे काय? प्रवाशांमध्ये संभ्रम

Coronavirus : हातावर शिक्का मारल्यानंतर पुढे काय? प्रवाशांमध्ये संभ्रम

Next

 मुंबई : विमानतळावर प्रवाशांची तपासणी केल्यानंतर त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना उपचारांसाठी विलगीकरण कक्षात पाठविले जाते. मात्र, लक्षणे नसल्यास घरच्या घरी अलगीकरण (होम कॉरंटाइन) केले जाते. विमानतळावरून संबंधितांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कुणाची, याबाबत अनिश्चितता असल्याने, संबंधित प्रवासी स्वत:च्या जबाबदारीवर घरी निघाल्यास सहप्रवासी घाबरून आक्षेप घेतात.

सध्या विमानातच प्रवाशांना कोणत्या देशातून प्रवास केला आहे, हे अर्जात लिहून द्यावे लागते. विमानातून बाहेर पडल्यावर एपीएचओ काउंटरवर थर्मल स्क्रीनिंगद्वारे प्रवाशंची तपासणी होते. ताप नसल्यास प्रवाशाला इमिग्रेशनकडे पाठविले जाते. त्यानंतर, पालिकेतर्फे हातावर होम कॉरंटाइन शिक्का मारला जातो. प्रतिबंधित देशांमधून आलेले नसल्यास व कोरोनाची लक्षणे नसल्यास प्रवाशांना घरी जाण्याची मुभा दिली जाते. त्यांच्याशी एपीएचओद्वारे सातत्याने संपर्क साधला जातो. इमिग्रेशन काउंटरवर शिक्का तपासला जातो. त्यानंतर, विमानतळाबाहेर निघण्याची परवानगी दिली जाते.

अशाच प्रकारे अमेरिकेहून आलेल्या दाम्पत्याची विमानतळावर तपासणी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये लक्षणे दिसत नसल्याने त्यांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले. दोघे मुंबईहून पुण्याला नातेवाइकांकडे गेले व तिथून सांगलीत जाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, हातावरील शिक्क्यामुळे इतर प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

मुंबई विमानतळावर रोज किमान ७ हजार प्रवासी येतात. त्यांना घरापर्यंत पोहोचविणे अशक्य असल्याचे मत विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. प्रवासी विमानतळावरून शिक्का मारून बाहेर पडल्यास इतर प्रवासी घाबरून आक्षेप घेतात, याबाबत बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

या देशांतून आल्यास १४ दिवस ‘होम क्वारंटाइन’
दुबई, कतर, ओमान, कुवैत या देशांमधून येणाºया प्रवाशांना बुधवारपासून १४ दिवस सक्तीचे होम क्वॉरंटाइन म्हणजे घरच्या घरी एकांतवासात ठेवण्यात येत आहे. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन, दुबई, कतर, ओमान व कुवैत जर्मनी येथून भारतात येणाºया प्रवाशांना १४ दिवस एकांतवासात राहणे सक्तीचे करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने ज्या देशांचा प्रवास करून आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाइन करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये राज्य सरकारकडून सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला.

दादर रेल्वे स्थानकात आढळलेल्या दोन जर्मन तरुणींचा अहवाल निगेटिव्ह
मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात दोन जर्मन तरुणी कोरोना संशयित आढळल्या होत्या. मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने या दोघींना अंधेरी येथील सेव्हन हिल रुग्णालयात दाखल केले. तपासणीअंती त्यांचा कोरोनाबाबतचा अहवाल निगेटिव्ह आला.
करमळी स्थानकातून १७ मार्च रोजी १९ आणि २२ वर्षीय दोन जर्मन तरुणींनी मांडवी एक्स्प्रेसमधून प्रवास केला. याच दिवशी रात्री ९.४०च्या सुमारास या तरुणी दादर स्थानकात उतरल्या. दादर स्थानकात थर्मल स्क्रीनिंगद्वारे तपासणी केली असता, त्यांच्यात कोरोना विषाणूंची लक्षणे आढळली. रेल्वे प्रशासनाने तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना सुमारे १२ तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. १८ मार्च रोजी सकाळी १० वाजता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
रेल्वे मंडळाच्या सूचनेप्रमाणे मध्य रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण या स्थानकावर थर्मल स्क्रीनिंगद्वारे प्रवाशांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीद्वारे व्यक्तींच्या शरीराचे तापमान किती आहे, कोरोना विषाणूंची लक्षणे दिसून येत आहेत का? अशी माहिती मिळते. संशयित रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले जाते.

Web Title: Coronavirus: What's next with a seal on your hand? Confusion among travelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.