Coronavirus : "माणसाच्या कामाक उद्या माणूसच येतलो"; खाकीतला वॉरियर्स कलेतून देतोय संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 11:13 AM2020-05-24T11:13:37+5:302020-05-24T11:24:29+5:30

कोरोनाच्या संकटातही २४ तासांच्या ड्युटीनंतर मिळणाऱ्या एका दिवसाच्या सुट्टीत जनजागृतीपर व्हिडीओ तयार करून सामाजिक कर्तव्य बजावत आपली कलाही जिवंत ठेवत आहे.

Coronavirus: Take care of humanity as much as possible, police appeal to the citizens vrd | Coronavirus : "माणसाच्या कामाक उद्या माणूसच येतलो"; खाकीतला वॉरियर्स कलेतून देतोय संदेश

Coronavirus : "माणसाच्या कामाक उद्या माणूसच येतलो"; खाकीतला वॉरियर्स कलेतून देतोय संदेश

Next

मनीषा म्हात्रे 
मुंबई : "लॉकडाऊन संपतला, कोरोनासुद्धा जातलो, पण.. माणुसकी तेवढी जपा, कारण.. माणसाच्या कामाक उद्या माणूसच येतलो" अशी आर्त हाक महाराष्ट्र-गोवा सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या एका खाकीतील कलाकाराने नागरिकांना दिली आहे. दिवस-रात्र रस्त्यावर उभा राहून सेवा बजावणाऱ्या हा खाकीतील कलाकार कोरोनाच्या संकटातही २४ तासांच्या ड्युटीनंतर मिळणाऱ्या एका दिवसाच्या सुट्टीत जनजागृतीपर व्हिडीओ तयार करून सामाजिक कर्तव्य बजावत आपली कलाही जिवंत ठेवत आहे.

मूळचे मालवणचे रहिवासी असलेले सुशांत पवार हे सध्या सिंधुदुर्ग महामार्ग सुरक्षा पथकात कार्यरत आहेत. पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असे त्यांचे छोटेसे कुटुंब. लहानपणापासून कलेची आवड जोपासत, कलाकार होण्याचे स्वप्न उराशी बांधून सुशांत यांचा जीवनप्रवास सुरू झाला. मुंबईसह राज्यभरात विविध नाटक, एकांकिका स्पर्धाही त्यांनी गाजवल्या. एमएमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असताना २००३ मध्ये पोलीस भरतीसाठी कॉल आला. परीक्षा दिली आणि पोलीस दलात निवडही झाली. तेव्हापासून त्यांनी कर्तव्यनिष्ठेत स्वतःला वाहून घेतले. अशात ५ वर्षांपूर्वी महाविद्यालयाच्या
झालेल्या शतक महोत्सवाने त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होऊन खाकीतील कलाकार पुन्हा एकदा जागा झाला. मालवण तसेच आजूबाजूच्या खेडापाड्यातील कलाकारांना एकत्र घेत त्यांनी आपली ड्युटी सांभाळून नाटक, एकांकिकामध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे त्यांचा सन्मानही करण्यात आला.  सुशांत यांचा हा प्रवास मात्र कोरोनाच्या संकटात सर्वांप्रमाणे लॉकडाऊनच्या वाटेवर येऊन थांबला.

हार मानेल तो जवान कसला आणि कला बंद ठेवेल तो कलाकार कसला. याप्रमाणेच महाराष्ट्र-गोवा सीमेवर कर्तव्य बजावत असताना मजुरांची गावाकडे जाण्यासाठी धडपड, पायपीट, ट्रक, टेम्पोतून सुरू असलेला जीवघेणा प्रवास, त्यातच आई-वडिलांच्या मागे धावणाऱ्या चिमुकल्या पावलांनी सुशांत यांच्या काळजाला हात घातला. डोळ्यातील अश्रू आणि भावनांना आवर घालत सुशांत आपले कर्तव्य बजावताना आपली कलाही जिवंत ठेवत आहे. यासाठी त्यांनी कोरोनाबाबत विविध व्हिडीओ तयार करत सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहे. इथे ना लाइट आहे ना मोठे कॅमेरे. फक्त मोबाइलवर प्रत्येक कलाकार पवार यांनी लिहिलेल्या स्क्रिप्टद्वारे विविध भूमिका बजावत आहे.

लॉकडाऊनच्या काळात त्यांनी असे ७ ते ८ व्हिडीओ तयार करून अन्य कलाकारांनाही प्रोत्साहित करत आहे. यात सद्यस्थितीत माणसाने माणुसकी जपणे गरजेचे आहे, कारण पुढे माणूसच माणसाच्या मदतीला येणार आहे. तसेच विनाकारण बाहेर पडणारी गर्दी असो वा स्वतःचा जीव धोक्यात घालणारे कोरोना योद्धा, तसेच लहान मुलांच्या समस्या अशा विविध विषयांना ते आपल्या कलेतून मांडत आहेत. कर्तव्य बजावताना तपासणीदरम्यान त्यांचा थेट संपर्क होतो. पोलिसांभोवती कोरोनाचा वाढता फास असतानाही जिद्दीने आणि कुठलीच भीती न बाळगता ते कर्तव्य बजावत आहेत. आपल्यामुळे कुटुंबीयाला बाधा तर होणार नाही ना ही भीती त्यांनाही सतावते आहे. मात्र कर्तव्यापलीकडे ते नगण्य असल्याचे पवार सांगतात.

हेही वाचा

दिल्लीच्या सरकारी जाहिरातीमध्ये सिक्कीमला दाखवला भारताचा शेजारी 'देश'; उडाली खळबळ

मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला

लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं

Web Title: Coronavirus: Take care of humanity as much as possible, police appeal to the citizens vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.