CoronaVirus: Mumbaikars, next 15 days are important; An important meeting was held by the Municipal Commissioner | CoronaVirus: मुंबईकरांनो, पुढील १५ दिवस महत्वाचे; पालिका आयुक्तांनी घेतली महत्वाची बैठक

CoronaVirus: मुंबईकरांनो, पुढील १५ दिवस महत्वाचे; पालिका आयुक्तांनी घेतली महत्वाची बैठक

मुंबई - कोरोना रुग्णांची संख्या मुंबईत वाढत असताना काही खाजगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची मागणीही वाढली आहे. यामुळे काही ठिकाणी रुग्णांचे हाल व नातेवाईकांना दुसरे रूग्णालय शोधण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. याची गंभीर दखल घेत महापालिका या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. हे अधिकारी ऑक्सिजन पुरवठादार, सहाय्यक आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन यांच्यात समन्वय साधून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेणार आहेत. (BMC appoint six officer for oxygen supply to CoronaVirus patient.)

खाजगी रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत. या प्रकरणी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यु काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. मुंबईतील रुग्णालयांना सध्या २३५ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन पुरवठा होत आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असल्याने अधिक ऑक्सिजनची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

पुढील १५ दिवस महत्वाचे....
कोविड रुग्णांची दैनंदिन संख्या सध्या ८ ते १० हजारावर स्थिरावली आहे. तरी पुढील १५ दिवस आणखी महत्त्वाचे आहेत. सध्या, महापालिका, शासकीय आणि खासगी असे दीडशे कोविड रुग्णालय आहेत. या रुग्णालयांमध्ये २० हजार खाटा असून येत्या आठवड्यात आणखी दोन हजार खाटा वाढविण्यात येणार आहेत, असे आयुक्तांनी या बैठकीत सांगितले. 

ऑक्सिजन पुरवठ्यात मुंबईला प्राधान्य...
राज्यात कोविड बाधितांसाठी ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरविणारे उत्पादक, यंत्रणा, वाहने यांच्यावर ताण येत आहे. अन्य राज्यातून ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करुन घेण्यासाठी शासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. ऑक्सिजन साठा वाढल्यानंतर मुंबई महानगराला अधिकचा ऑक्सिजन साठा प्राधान्याने पुरविला जाईल, असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सांगितले. 

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी समन्वय अधिकारी...
मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांसाठी प्रत्येकी चार विभागास एक याप्रमाणे समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकी चार विभागास एक याप्रमाणे एकूण सहा ऑक्सिजन पुरवठादार नेमण्यात येणार आहे. पालिकेचे समन्वय अधिकारी अन्न व औषध प्रशासन, विभागांचे सहाय्यक आयुक्त आणि ऑक्सिजन पुरवठादार यांच्यात समन्वय साधून ऑक्सिजन पुरवठा योग्यरित्या व वेळीच उपलब्ध होत राहील, यासाठी दक्षता घेतील. विशेषतः ६४ नर्सिंग होममध्ये कोणतीही अडचण उद्भवणार नाही, यासाठी ते समन्वय साधतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus: Mumbaikars, next 15 days are important; An important meeting was held by the Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.