CoronaVirus News: सणासुदीच्या नयनरम्य रोषणाईलाही कोरोनाचे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 04:11 AM2020-08-09T04:11:32+5:302020-08-09T04:13:34+5:30

लोहार चाळ मार्केटमध्ये शुकशुकाट; भारतीय साहित्यालाही मागणी नाही

CoronaVirus decoration market hits badly due to corona crisis | CoronaVirus News: सणासुदीच्या नयनरम्य रोषणाईलाही कोरोनाचे ग्रहण

CoronaVirus News: सणासुदीच्या नयनरम्य रोषणाईलाही कोरोनाचे ग्रहण

Next

मुंबई : गणेशोत्सव, नवरात्रौस्तव, दिवाळी, ख्रिसमस सण कोणताही असो मंबई आणि सभोवतालच्या शहरांतील घराघरांत दिसणाऱ्या नयनरम्य विद्युत रोषणाईचे ‘कनेक्शन’ लोहार चाळ मार्केटशी जोडलेले आहे. परंतु, यंदा कोरोना संकटामुळे हे मार्केटच अंधारात बुडाले आहे. स्वस्तात मिळणाºया चिनी साहित्यावर बहिष्कार टाकून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा व्यापाऱ्यांचा इरादा आहे. मात्र, उत्पादनांना गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्केसुद्धा मागणी नाही. त्यामुळे कशावर बहिष्कार टाकायचा आणि काय विकायचे, या चिंतेने त्यांना ग्रासले आहे.

लोहारांची वस्ती असलेली या चाळीच्या परिसराने आता कात टाकली आहे. लोहार समाजाची वस्ती नामशेष झाली आहे. क्रॉफर्ड मार्केटनजीकच्या या परिसराचा गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे होलसेल आणि रिटेल मार्केट म्हणून उदय झाला आहे. एलईडी बल्बच्या तोरणांपासून ते कंदिलांपर्यंत आणि लेझर दिव्यांपासून ते डिस्को लाईटपर्यंत सजावटीच्या असंख्य वस्तू अत्यंत किफायतशीर दरांमध्ये मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे लोहार चाळ. गणेशोत्सवाचे वेध लागल्यानंतर या वस्तूंची खरेदीसाठी उसळणारी झुंबड ख्रिसमसपर्यंत कायम असते. वसई, विरार, पनवेल, अंबरनाथ बदलापूरपर्यंतचे हजारो किरकोळ व्यापारी इथूनच विद्युत रोषणाईच्या साहित्याची खरेदी करतात. या भागात सुमारे दीड हजार छोटीमोठी दुकाने असून त्यांची जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांतली आर्थिक उलाढाल सुमारे १० हजार कोटींपेक्षाही जास्त असते. मात्र, यंदा मार्केटमध्ये शुकशुकाट आहे. दरवर्षी इथे ७० टक्के चिनी आणि ३० टक्के भारतीय मालाची विक्री होते. परंतु, यंदा चिनी मालाची आवक झालेली नाही. आम्हाला दोन पैसे कमी मिळतील आणि ग्राहकही देशप्रेमासाठी थोडी महाग वस्तू विकत घेईल, अशी आमची आशा होती. मात्र, सणांचा हंगाम सुरू झाल्यानंतरही बाजारच अनिश्चितेच्या गर्तेत सापडलेला आहे.

आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या
गेल्या वर्षी गणेशोत्सवाला १५-२० दिवस शिल्लक होते तोपर्यंत मी दोन लाखांचे साहित्य विकले होते. यंदा १० हजारसुद्धा हाती पडलेले नाहीत. पगारापोटी चार लाख तर दुकानाच्या भाड्यापोटी ८ लाख रुपये मोजावे लागले आहेत. लोकल बंद असल्याने दुकानात येणे मला परवडत नाही. आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या अशी परिस्थिती झाली आहे.
- दलपत सोळंकी, श्री माकेश्वरी इलेक्ट्रॉनिक्स,

मार्केटची अभूतपूर्व कोंडी
जुले ते आॅक्टोबर या चार महिन्यांवरच वर्षभराच्या व्यवसायाची मदार असते. परंतु, कोरोनाची दहशत आणि लॉकडाऊनच्या विचित्र निर्बंधामुळे व्यवसाय बुडाला आहे. काम करणारे मजूर गावी गेले आहेत. जे आहेत त्यांच्या हाताला काम नाही. लोकल बंद असल्याने त्यांना कामावर येणे परवडत नाही. अनेक शहरांत लॉकडाऊनचे निर्बंध कायम आहेत. त्यामुळे मालाला उठाव नाही. त्यामुळे व्यापारी अभूतपूर्व संकटात सापडले आहेत.
- नितीन पारेख, कार्याध्यक्ष, व्यापारी संघटना

Web Title: CoronaVirus decoration market hits badly due to corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.