Coronavirus: राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या नियंत्रणात; मुंबईत आलेख चढाच 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 02:44 AM2020-10-11T02:44:09+5:302020-10-11T02:44:22+5:30

टास्क फोर्स । मास्क घालण्याविषयी अजूनही मुंबईकरांमध्ये गांभीर्य नाही

Coronavirus: daily patient control in the state; The graph is rising in Mumbai | Coronavirus: राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या नियंत्रणात; मुंबईत आलेख चढाच 

Coronavirus: राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या नियंत्रणात; मुंबईत आलेख चढाच 

Next

मुंबई : राज्यात मागील सहा दिवसांत १५ हजारांपेक्षा कमी नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे मुंबईत मात्र रोजच्या निदानाचा आकडा हा दोन हजारांच्या घरात असल्याचे समोर आले आहे.

राज्यात सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानामुळे शोध, तपासणी, निदान या सूत्रांद्वारे वेगाने अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. परिणामी, अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींचा शोध घेतल्याने त्यांना उपचार प्रक्रियेत आणणे सोपे झाले आहे. दुसरीकडे मुंबईत वाढणाऱ्या निदानाला मुंबईकरांच्या चुकीच्या सवयी कारणीभूत असल्याचे मत टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी मांडले.
कोविडपश्चातची जीवनशैली मुंबईकरांनी अजून स्वीकारलेली नाही. मास्क घालण्याविषयी अजूनही मुंबईकरांमध्ये गांभीर्य नाही, त्यामुळे संसर्गाची साखळी तुटत नसल्याने रुग्ण वाढत आहेत. परिणामी, मुंबई महापालिकेने याची दखल घेऊन मास्क न घालण्याविषयीच्या दंडात वाढ करावी. पालिका असो किंवा राज्य सरकार, दोन्ही प्रशासनाकडून कडक निर्बंधांची सक्ती केली जात नाही. नियम पाळणे ही सामान्यांचीही जबाबदारी आहे. अनेकदा ते नियम पाळताना दिसत नाहीत, असे टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी म्हणाले.

मुंबईत आता ६० टक्क्यांहून अधिक व्यवहार सुरळीत झाले आहेत किंवा होण्याच्या प्रक्रियेत आहेत. अशा स्थितीत लोकसंख्येची घनता लक्षात घेता संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केवळ प्रशासनाचे प्रयत्न पुरे पडणार नाहीत, हे सामान्यांनी ओळखले पाहिजे, असे मतही त्यांनी मांडले.

चाचण्या वाढल्याचा परिणाम
मुंबईत वाढणाºया कोरोनाच्या रुग्णसंख्येविषयी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, चाचण्यांची क्षमता वाढविल्यामुळे रुग्णसंख्येचा आलेख वाढत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये मुंबईत सर्वाधिक चाचण्या पार पडल्या. पालिकेने गेल्या सहा महिन्यांत ११ लाख ६८ हजार चाचण्या केल्या. यापैकी ५२ टक्क्यांहून अधिक चाचण्या आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये करण्यात आल्या.

Web Title: Coronavirus: daily patient control in the state; The graph is rising in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.