मुंबई : लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी आहे. मुंबईतही एकूण रुग्णांच्या तुलनेत दहा वर्षांखालील मुलांना कोरोनाची लागण होण्याचा दर कमी आहे. पण, अनलॉक म्हणजेच ‘पुनश्च् हरिओम’नंतर लहानग्यांत संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे. जून अखेरपर्यंत मुंबईत १० वर्षांखालील १ हजार ३११ रूग्ण आढळले. यातील सात जणांचा मृत्यू झाला.
देशात १० वर्षांखालील आणि १० ते २० वयोगटातील कोरोनाचे रूग्ण कमी असून ही दिलासादायक बाब आहे. लहान मुलांचे लसीकरण झालेले असते, त्यांची प्रतिकारकशक्ती चांगली असते. त्यामुळे त्यांच्यात संसर्ग कमी दिसतो.
राज्यासह मुंबईत शून्य ते १० आणि १० ते २० वयोगटातील रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त नव्हते. पण, आता मात्र मुंबईच्या आकडेवारीनुसार ३० जूनपर्यंत ० ते १० वयोगटातील सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते २० वयोगटातील १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शून्य ते १० वयोगटातील १ हजार ३११ मुले कोरोनाग्रस्त झाली आहेत. तर १० ते २० वयोगटातील २ हजार ४२८ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. जूनअखेरपर्यंत सात बालकांचा मृत्यू झाला. या बालकांना कोरोनाचा संसर्ग होता. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल किंवा त्यांना काही इतर आजार असावेत अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी लहान मुलांची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.प्रोटीनयुक्त आहार देण्याचा तज्ज्ञांचा सल्लाबालरोगतज्ज्ञ डॉ. नेहा शेणवी यांनी अनलॉकमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्ट केले आहे. तर पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, लहान मुलांना घराबाहेर नेऊ नका, त्यांना प्रोटीनयुक्त आहार द्यावा आणि त्यांची योग्य ती काळजी घ्यावी.