Join us

कोरोना काळात उत्तर प्रदेशात दाखल मजुरांना मूळ गावीच मिळतोय रोजगार; प्रशासनाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:27 IST

उत्तर प्रदेश प्रशासनाचा दावालोकमत न्यूज नेटवर्कसचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कलखनऊ : पोटापाण्यानिमित्त इतर राज्यांत रोजगारासाठी स्थलांतरित ...

उत्तर प्रदेश प्रशासनाचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क

लखनऊ : पोटापाण्यानिमित्त इतर राज्यांत रोजगारासाठी स्थलांतरित झालेले मजूर कोरोना काळात उत्तर प्रदेश येथील आपल्या मूळ गावी दाखल झाले. यातील बहुतांशी मजूर पुन्हा मुंबई - महाराष्ट्र अथवा इतर राज्यांत रोजगारानिमित्त स्थलांतरित होत असेल तरी त्या-त्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी रोजगार मिळावा म्हणून तेथील सरकारे कार्यरत झाली; आणि याकामी आम्ही आघाडी घेतल्याचा दावा उत्तर प्रदेश प्रशासनाने केला.

महाराष्ट्र, मुंबईतून जे लोक उत्तर प्रदेश येथे परतत आहेत; त्यांना आपण रोजगार देण्याचा प्रयत्न करीत आहोत. एव्हाना अनेकांना रोजगार दिला, असा दावा उत्तर प्रदेश प्रशासनाने केला. २४ जानेवारी, उत्तर प्रदेश दिनानिमित्त लखनऊमध्ये मुंबई, दिल्ली आणि कोलकातास्थित पत्रकारांशी प्रशासनाने संवाद साधला. या वेळी रोजगार, पायाभूत सेवा-सुविधा, गुन्हेगारी, पर्यटन आणि देवस्थानांबाबत माहिती दिली.

आम्ही खूप काम करीत आहोत. कोरोना काळातदेखील खूप काम केले आहे. कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी१८ कोटी लोकांपर्यंत पोहोचलो. येथील एकूण लोकसंख्या २४ कोटी आहे. रोज काेराेनाची ३०० प्रकरणे निदर्शनास येत आहेत. मात्र आता आम्ही लसीकरण मोहीम वेगाने हाती घेतली आहे.

उत्तर प्रदेश राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. येथे परकीय कंपन्या गुंतवणूक करीत आहेत. ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आम्ही दोन नंबरला आहोत. ४ लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. पायाभूत सेवा-सुविधांची कामे वेगाने सुरू असून, एक्स्प्रेस-वे बांधले जात आहेत. गंगा एक्स्प्रेस-वे सर्वांत मोठा असणार आहे.

स्थलांतरित लोकांची माहिती गोळा करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत आहोत. गेल्या तीन वर्षांत चार लाख लोकांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या. २७ लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

* माफियांची ४७५ कोटींची संपत्ती जप्त

२५ माफियांची ४७५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. ८ असे माफिया आहेत ज्यांच्यावर कारवाई होत आहे. सायबर क्राइमबाबत १८ पोलीस ठाणी स्थापन केलीत. डिजिटल काम सुरू असून यूपी डिजिटल होत आहे. डेटा सेंटरचे काम सुरू आहे. गेल्या ७५ वर्षांचा विचार करता गेल्या वर्षी माफियांवर सर्वाधिक कारवाई झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

..................................