Join us

मुंबईत दोन डोस घेतलेल्या सात हजारांहून अधिक जणांना कोरोना संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:12 IST

मुंबई : कोरोनाविरोधात कोरोना प्रतिबंधक लस हे एकमेव शस्त्र आहे, मात्र लसीकरण पूर्ण झालेल्या म्हणजेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या ...

मुंबई : कोरोनाविरोधात कोरोना प्रतिबंधक लस हे एकमेव शस्त्र आहे, मात्र लसीकरण पूर्ण झालेल्या म्हणजेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या ७ हजार ५७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मुंबई पालिका प्रशासनाने दिली आहे.

इंग्लंडमधील यूके ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्स म्हणजेच ओएनएसने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २१ दिवसांनंतर लस घेतलेली व्यक्ती या विषाणूपासून सुरक्षित होते. म्हणजेच लस घेतल्यानंतर तीन आठवड्यांना शरीर अशा स्थितीमध्ये पोहोचते की ज्यामुळे व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ शकत नाही. तसेच लस घेतल्यानंतर २१ दिवस उलटून गेल्यावरही संसर्ग झालाच तर त्याचे फारसे दुष्परिणाम होत नाही. रुग्णाची प्रकृती खालावण्याची किंवा त्याला रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता अगदीच कमी असते. कोरोनाची लस घेतल्यानंतर २१ दिवसांनंतर म्हणजेच तीन आठवड्यांनंतर शरीरामध्ये कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासंदर्भातील अपेक्षित बदल घडतात. मात्र या २१ दिवसांदरम्यान लस घेतलेल्या व्यक्तीने कोरोना प्रोटोकॉल पाळले नाहीत आणि बेजबाबदारपणे वागल्यास त्याला कोरोना संसर्गाचा धोका असतो.

लस घेतल्यामुळे व्यक्तीच्या शरीरात निर्माण झालेल्या संरक्षण करणाऱ्या प्रतिकार शक्तीला भेदून ती व्यक्ती संक्रमित झाली म्हणून असा संसर्ग झालेल्या रुग्णाला ब्रेकथ्रू केस असेही म्हणतात. ब्रेकथ्रू संसर्गाच्या फार कमी केसेस नोंदल्या गेल्या आहेत. मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, दोन्ही डोस घेणाऱ्या २४ लाखांपैकी फक्त ०.३४ टक्के व्यक्तींना संसर्गाची बाधा झाली आहे. लस घेतल्यामुळे आजाराची तीव्रता कमी होते. लसीकरणानंतर संसर्ग झाल्यास रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वा ऑक्सिजनची आवश्यकता भासत नाही. शिवाय, त्यांना त्या लक्षणांनुसार उपचार दिले गेले आहेत. दोन्ही डोसनंतर आजाराची तीव्रता कमी होत असल्याचे दिसून आले आहे.