Join us  

कोरोना त्यात बर्ड फ्लू : आतापर्यंत बर्ड फ्लू (एव्हियन इन्फ्लूएंझा)चे कोणतेही मानवी प्रकरण नोंदलेले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:15 AM

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनाचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला असतानाच आता इतर राज्यांत ...

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनाचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला असतानाच आता इतर राज्यांत बर्ड फ्लूने डोके वर काढले आहे. परिणामी, मुंबई आणि महाराष्ट्रातदेखील काळजी घेण्यात यावी. कच्चे मांस खाऊ नये. स्वच्छता राखावी, असे आवाहन आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती करीत आहेत. केंद्राने सर्व राज्यांना याबाबत सूचना केल्या आहेत. मुंबई शहर आणि उपनगराचा विचार करता मुंबई महापालिकेने अद्याप याबाबतच्या सूचना दिल्या नसल्या तरी नागरिकांनी खबरदारी बाळगली पाहिजे, असे आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींचे म्हणणे आहे.

उत्तर भारतात राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश येथे कोंबड्या आणि पक्ष्यांना बर्ड फ्लू झाल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. तसे जाहीर केले आहे. शिवाय दक्षिण भारतात केरळ येथेदेखील बर्ड फ्लूचा प्रभाव आहे. परिणामी, केंद्र सरकारने देशभर सूचना केल्या आहेत. मुंबई अथवा महाराष्ट्रात बर्ड फ्लू निदर्शनास आलेला नाही. तरीदेखील कच्चे मांस खाऊ नये. अधिकाधिक स्वच्छता राखावी, अशा सूचना दिल्या जात आहेत. विशेषतः जेथे कोरोनाचा प्रभाव अधिक आहे अशा ठिकाणी स्वच्छता राखावी. मांस पूर्ण शिजवून खावे, अशा सूचना केल्या जात आहेत.

मुंबई महापालिकेने अद्याप याबाबत सूचना जारी केलेल्या नाहीत. मात्र कोरोनासारख्या आजाराचे थैमान सुरू असतानाच बर्ड फ्लूने डोके वर काढले तर अडचणी आणखी वाढतील, असे तज्ज्ञ व्यक्तींचे म्हणणे आहे. मुळात कोंबड्या आणि बदके यामध्ये हा आजार दिसून येत असून, मुंबईत अद्याप तरी याबाबत काही आढळलेले नाही. तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, असे म्हणणे मांडले जात आहे. दरम्यान, बुधवारी ठाणे येथे १५ बगळे मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

आरोग्य मंत्रालयाने केरळ आणि हरयाणामधील एव्हियन इन्फ्लूएंझा अर्थात बर्ड फ्लूबाधित जिल्ह्यांमध्ये पथके तैनात केली आहेत. राजस्थानातील झालावाड, मध्य प्रदेशातील भिंड येथेही कावळे आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझाचे असेच अहवाल प्राप्त झाले आहेत. पशुसंवर्धन विभागाने कुक्कुट पक्ष्यांमधील असे प्रकरण शोधण्यासाठी अधिक पाळत ठेवण्याचा इशारा दिला आहे. आतापर्यंत एव्हियन इन्फ्लूएंझाचे कोणतेही मानवी प्रकरण नोंदलेले नाही. वाढत्या परिस्थितीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची करडी नजर आहे.