Join us  

मालाड कोकणीपाड्यातील वादग्रस्त बांधकाम अखेर 'जमीनदोस्त'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:06 AM

धमक्यांना झुगारत सहायक आयुक्तांच्या हजेरीत कारवाई पूर्णलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालाड कोकणीपाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने पालिकेची ...

धमक्यांना झुगारत सहायक आयुक्तांच्या हजेरीत कारवाई पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालाड कोकणीपाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने पालिकेची जागा बळकावत केलेले अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी येणाऱ्या पालिका पी/उत्तर विभागावर दगडफेक करण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे सहायक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी स्वतः घटनास्थळी हजर राहत १५०० स्क्वेअर फुटाचे बांधकाम गुरुवारी जमीनदोस्त केले. त्यामुळे नियोजित रस्त्यातील अडथळा कायमचा दूर झाला आहे.

गुरुवारी सकाळी १ जेसीबी आणि जवळपास १०० अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे पथक घेऊन पी/उत्तरचे सहायक आयुक्त मकरंद दगडखैर हे कोकणीपाड्यात दाखल झाले. कुरार पोलिसांनी त्यांना वेळीच आवश्यक तितका बंदोबस्त पुरविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अजित रावराणे यांनी या जागेवर अनधिकृत बांधकाम करत त्याठिकाणी बेकायदेशीर कामे सुरू असल्याचा आरोप भाजप नगरसेवक विनोद मिश्रा यांनी करत पालिका आयुक्त इकबलसिंह चहल यांच्याकडे कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार दगडखैर यांनी दगडफेकीच्या धमक्यांना न जुमानता १५०० स्क्वेअर फुटांवर तयार करण्यात आलेले बांधकाम तोडून टाकले.

अश्लीलतेवर आता ‘अंकुश’

‘कोकणीपाड्यातील अनधिकृत बांधकामामध्ये दारू पार्ट्या आणि अश्लील गोष्टी चालायच्या. ज्यावर अंकुश बसविण्यात पोलीस आणि पालिका प्रशासनाला यश मिळाले असून पुन्हा अशा गोष्टी होणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.

(विनोद मिश्रा - नगरसेवक , भाजप)

बंदोबस्त घटनास्थळी पाठवला

‘पालिकेचे अधिकारी बंदोबस्त मागण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्यावर आम्ही लगेचच त्यांच्या मदतीसाठी बंदोबस्त घटनास्थळी रवाना केला’.

(प्रकाश बेले - वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कुरार पोलीस ठाणे )

फोटो ओळ: आधी/नंतर... कोकणीपाड्यातील १५०० स्क्वेअर फूट बांधकाम पी/उत्तरने निष्कासित केले.