Join us  

ओएनजीसी सर्वेक्षणाला विरोध

By admin | Published: April 11, 2015 10:35 PM

मत्स्यसंपदेचा गोल्डन बेल्ड समजल्या जाणाऱ्या डहाणू ते जाफराबाद दरम्यानच्या भागातील ६० ते ७० नॉटीकल सागरी मैलावर ओएनजीसीच्या वतीने महाकाय जहाजे सर्वेक्षण करीत आहेत.

पालघर : मत्स्यसंपदेचा गोल्डन बेल्ड समजल्या जाणाऱ्या डहाणू ते जाफराबाद दरम्यानच्या भागातील ६० ते ७० नॉटीकल सागरी मैलावर ओएनजीसीच्या वतीने महाकाय जहाजे सर्वेक्षण करीत आहेत. यामुळे आसपास मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यावरून सर्वेक्षण जहाजे नेऊन त्यांच्या जाळ्यांची मोठ्या प्रमाणात नासधुस होत असल्याने मच्छीमारामधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.समुद्रात ओएनजीसीच्या वतीने काही खनीज द्रव्याच्या साठ्यांच्या शोधासाठी सुमारे ६० ते ७० नॉटीकल मैल क्षेत्रात फेब्रुवारी महिन्यापासून सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण डहाणू दमण ते थेट जाफराबाद या मत्स्य संपदेची खाण समजल्या जाणाऱ्या भागात होत असल्याने इतर भागात मासे पकडण्यासाठी कितीही जाळी मारली तरी जाळ्यामध्ये पुरेसे मासेच मिळत नसल्याने मच्छीमारांच्या ट्रिपाचा खर्च (खेपा) वाया जात आहे.समुद्रात सुरू असलेल्या महाकाय जहाजाच्या पाठीमागे १ ते २ कि. मी. अंतराचे मोठ मोठे वायर्स जोडलेले असुन त्यावर सर्वेक्षणाचे अत्याधुनिक साहित्याचे फ्लोटस जोडलेले असतात. ही जहाजे त्यांनी ठरविलेल्या जागेमध्ये वेगाने फिरत असल्याने त्या वायर्सच्या सानिध्यात कोणतीही मच्छीमार बोट किंवा जाळी येऊ नये यासाठी मच्छीमारांच्या भाडे तत्वावर घेतलेल्या सिक्युरिटी बोटी तैनात केलेल्या असतात. मच्छीमारांच्या बोटी किंवा जाळी उधाणाच्या पाण्याच्या प्रवाहाने त्यांनी ठरविलेल्या निषीद्ध क्षेत्राजवळपास चुकून गेल्यास मच्छीमारांना शिवीगाळ व दमदाटी करून हुसकावून लावले जात असल्याच्या मच्छीमारांच्या तक्रारी आहेत. उधाणाच्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जाणाऱ्या अनेक मच्छीमारांच्या जाळ्यांची, शिंद्याची (झेंडा) मोडतोड व नासधुस सर्वेक्षणाच्या जहाजासह काही सिक्युरीटी बोटधारकांनी केल्याने सर्वोदय सहकारी संस्थेने मच्छीमारांचे तर मच्छीमार सहकारी संस्थांनी नुकसान भरपाईचे प्रस्ताव ओएनजीसीकडे पाठविल्याचे कळते. त्यामुळे एकीकडे माशांच्या जाळ्यांचे नुकसान तर दुसरीकडे मासेच मिळत नसल्याने मच्छीमार बांधव दुहेरी संकटात सापडला आहे. (वार्ताहर)या सर्व्हेक्षणामुळे मासेमारी क्षेत्र कमी होऊन बोटीना मासेच मिळत नसल्याने बोटी रिकाम्या हातानी परत येत आहेत.- सुभाष तरे, एम.डी. सर्वोदय सह. संस्था