Join us  

‘बीडीडी’त संक्रमण शिबिरांसाठी करार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 6:02 AM

आठ दिवसांत ८१ रहिवाशांसोबत करार

मुंबई : एन.एम. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया म्हाडामार्फत सुरू करण्यात आली आहे. यासाठी गेल्या आठ दिवसांपासून येथील ८१ रहिवाशांसोबत संक्रमण शिबिरांसाठी करार करण्यात आल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. टप्प्याटप्प्याने बीडीडी चाळींमधील रहिवाशांसोबत करार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एन.एम. जोशी मार्ग येथील रहिवाशांसोबत कराराची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.एन.एम. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींत आठशे रहिवासी आहेत. यातील ४५१ जणांची पात्रता निश्चितीची प्रक्रिया पार पडली असून उर्वरित ३४९ जणांची पात्रता निश्चितीची प्रक्रिया उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे, असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.म्हाडाने रहिवाशांच्या सुविधेसाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या मदतीने आॅन द स्पॉट नोंदणीची सुविधा देऊ केली आहे. यानुसार थेट रहिवाशांच्या दारात जाऊन हे करार करण्यात येत आहेत. आयजीआर विभागाने पॉज मशीनचा वापर करून नोंदणी करायला सुरुवात केली आहे. यासाठी म्हाडामार्फत प्रत्येकी सातशे रुपये मोजण्यात येत आहेत.गेल्या आठ दिवसांपासून येथील ८१ रहिवाशांसोबत संक्रमण शिबिरांसाठी करार करण्यात आले आहेत. एन.एम. जोशी मार्ग येथे एकूण ३२ बीडीडी चाळी आहेत. यातील सात चाळींमधील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतरित करण्यात येईल.या संपूर्ण पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडाला १७ हजार ४४ कोटींची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील एन.एम. जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडा स्वत: २ हजार ४०० कोटींची गुंतवणूक करणार आहे.उर्वरित प्रकल्पांसाठी सदनिका विक्रीतून पैसे गुंतवण्याचा म्हाडाचा मानस आहे. आगामी तीस महिन्यांत पहिल्या टप्प्यातील इमारत बांधणीचे काम पूर्ण करण्याचा म्हाडाचा मानस आहे. प्रकल्प सात वर्षांमध्ये तीन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल, असे म्हाडाकडून संगण्यात आले.