Join us  

रुग्णालयात कॉन्स्टेबल प्रेमी युगुलाचा धिंगाणा

By admin | Published: September 28, 2016 2:24 AM

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद असलेल्या खाकी वर्दीतील एका प्रेमी युगुलाचे आगळे रूप नागपाडा येथील पोलीस रुग्णालयात अ‍ॅडमिट असलेल्या अन्य रुग्णांना पाहावयास मिळाले.

- जमीर काझी, मुंबई‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद असलेल्या खाकी वर्दीतील एका प्रेमी युगुलाचे आगळे रूप नागपाडा येथील पोलीस रुग्णालयात अ‍ॅडमिट असलेल्या अन्य रुग्णांना पाहावयास मिळाले. कॉन्स्टेबल असलेल्या युवक-युवतीमध्ये जोरदार वादावादी झाली. संतप्त झालेल्या तरुणीने रुग्ण कॉन्स्टेबलला मारहाण केली. त्यांच्या भांडणामुळे अन्य पेशंट घाबरल्याने शेजारच्या बेडवरील एका पोलीस रुग्णाने त्यांची सोडवणूक केली. तरुणीला वॉर्डमधून बाहेर काढले.पोलिसांसाठी असलेल्या रुग्णालयात रात्री घडलेल्या या प्रकाराबाबत रुग्णालयातील डायरीत कसलीही नोंद करण्यात आलेली नाही. तर रुग्ण असलेल्या कॉन्स्टेबलला तातडीने मंगळवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्यातील हाणामारीची चर्चा दिवसभर रुग्णालयाच्या परिसरात सुरू होती. मुंबई पोलीस दलात २०११ च्या बॅचमध्ये भरती झालेला तरुण नायगाव सशस्त्र विभागात (एल.ए.१) मध्ये नियुक्तीला आहे. त्याचे या ठिकाणी असलेल्या तरुणी कॉन्स्टेबलशी प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात काही कारणावरून मतभेद निर्माण झाले. ५-६ दिवसांपासून हा तरुण विचित्र वागत असल्याने, विनाकारण आरडाओरड करीत असल्याने त्याच्या नातेवाइकाने त्याला नागपाडा रुग्णालयात दाखल केले होते. काल दुपारी त्याला भेटण्यासाठी त्याची प्रेयसी अन्य एका महिला कॉन्स्टेबलसमवेत गणवेशतच आली होती. तो भेटण्यास टाळाटाळ करू लागल्याने तिने आत्महत्या करण्याची धमकी दिल्यानंतर त्याने पहिल्या मजल्यावरील वॉर्डमधून खाली जाऊन तिची भेट घेतली. त्या वेळी त्यांच्यात भांडण झाले असताना रुग्णालयातील डॉक्टरांनी समजूत काढून तिला पाठवून दिले. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास ती पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली. वॉर्डात त्याच्या बेडजवळ जाऊन बोलत असताना त्यांच्यात पुन्हा वाद झाला. ती मारू लागल्याने तरुण ओरडू लागला. या गोंधळामुळे वॉर्डमधील अन्य पेशंट जागे झाले. मात्र त्यांची सोडवणूक करण्यास कोणी धजावत नव्हता. अखेर पोटदुखीमुळे त्रस्त असल्याने अ‍ॅडमिट असलेल्या एका पोलिसाने हिंमत दाखवीत तरुणीला त्याच्यापासून बाजूला केले. त्यानंतर रुग्णालयात ड्युटीला असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी व वॉर्डबॉय तेथे आले. त्यांनी तरुणीला खाली नेऊन तेथे समजूतघातली. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर तरुणी निघून गेली. घडलेल्या प्रकाराची चर्चा दिवसभर अन्य पेशंटमध्ये सुरू होती. मात्र त्याबाबत कसलीही नोंद करण्यात आली नाही. पुन्हा असा प्रकार घडू नये, यासाठी डॉक्टरांनी त्या तरुणाला मंगळवारी सकाळी डिस्चार्ज देऊन घरी पाठविले. दरम्यान, या प्रकाराबाबत पोलीस रुग्णालयातील अधीक्षक एम.एम. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत. त्यांच्या कार्यालयाचा दूरध्वनीही बंद होता. महिला कॉन्स्टेबलची आत्महत्येची धमकी महिला कॉन्स्टेबल ही तरुणाला आपण दोघे आत्महत्या करू, नाही तर मी आत्महत्या करेन, पण तुला सोडणार नाही, असे वारंवार सांगत होती, तर कॉन्स्टेबल तिला पाहून किंचाळल्यासारखा करत होता असे वॉर्डमधील अन्य रुग्णांनी सांगितले.