'कधीही प्रकाशात न आलेल्या पक्षाने शॅडो कॅबिनेटचा निर्णय घेतला आहे'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 07:01 PM2020-03-09T19:01:32+5:302020-03-09T19:03:34+5:30

राज्य सरकारचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेट तयार केले असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.

Congress Leader Sachin Sawant Has Criticized MNS's Shadow Cabinet mac | 'कधीही प्रकाशात न आलेल्या पक्षाने शॅडो कॅबिनेटचा निर्णय घेतला आहे'

'कधीही प्रकाशात न आलेल्या पक्षाने शॅडो कॅबिनेटचा निर्णय घेतला आहे'

Next

मुंबई: मनसेच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. राज्य सरकारचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेट तयार केले असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. मनसेच्या शॅडो कॅबिनेटचे भाजपाने स्वागत केले आहे. मात्र काँग्रेसकडून मनसेच्या या भूमिकेवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, शॅडो कॅबिनेटचा निर्णय अशा शॅडो पक्षाने घेतला आहे जो १४ वर्ष कधीही प्रकाशात आला नाही, कुठलाही प्रकाश पाडू शकला नाही. आंदोलने करायची आणि अंधारात सेटलमेंट करायची हे रात्रउद्योग जनतेने गेली अनेक वर्ष पाहिलेले आहेत. त्यामुळे याचा काडीमात्र प्रभाव जनतेवर पडणार नाही, हे मात्र निश्चित असं म्हणत सचिन सावंत यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.

मनसेच्या शॅडो कॅबिनेटचे भाजपाकडून स्वागत करण्यात आले आहे. भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी राज्य सरकार जर चुकीचे निर्णय घेत असेल तर मनसेचे शॅडो कॅबिनेट जनतेला पटवून देईल असे मत व्यक्त केले आहे. तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर म्हणाले की, सरकार कोणत्या प्रकारे काम करत आहे. तसेच सरकारविषयी काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे जाणून घेण्याचा अधिकार जसा माध्यमांना आहे त्याचप्रमाणे सामान्य जनतेला देखील आहे. मनसेचे सध्या आमदार व नगसेवक जास्त नसल्यामुळे पक्षाला पुन्हा एकदा भरारी घ्यायची आहे. त्यामुळे काही कामं चालू ठेवण्यासाठी मनसेच्या नेत्यांना राज ठाकरेंनी कामं दिली आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितले.

मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटची नावे घोषित केली. त्यामध्ये सरकारच्या प्रमुख खात्यांवरील चांगल्या वाईट हालचालीवर लक्ष ठेवण्याची संबंधित नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात राज्यभरातील प्रमुख मनसे पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच शॅडो कॅबिनेटमध्ये अमित ठाकरे यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. 

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात शॅडो केबिनेटच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे देखील कान खेचले. संबंधित खात्यावर देखरेखीची जबाबदारी मिळाली म्हणजे, आपण मंत्री झालो असे कोणाला वाटू नये असेही त्यांनी सांगितले. पैशाचं खातं मिळाल नाही म्हणून हट्ट देखील करू नये अशी कोपरखळी देखील राज ठाकरेंनी यावेळी मारली. शॅडो केबिनेटची जबाबदारी सरकारच्या चुकीच्या कामांवर ताशेरे ओढण्याची असेल. यादरम्यान चांगल्या कामाचं कौतुक देखील त्यांनी करावं असेही राज ठाकरे यांनी सुचवले. तर आरटीआय टाकून ब्लॅकमेल करण्याचा काहींचा धंदा झाला असून यापुढे असे आरटीआय टाकायचे नाही अशी तंबी देखील राज ठाकरेंनी यावेळी दिली. 

Web Title: Congress Leader Sachin Sawant Has Criticized MNS's Shadow Cabinet mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.